भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अध्यक्षपदावर सौरव गांगुलीची निवड होताच भारतीय क्रिकेटमध्ये बरेच सकारात्मक पावलं उचलली जाताना पाहायला मिळत आहेत. गांगुलीनं स्थानिक क्रिकेटपटूंच्या हिताच्या दृष्टीनं निर्णय घेत, कौतुकास्पद कामगिरी केली. माजी कर्णधार गांगुलीनं आणखी एक कौतुकास्पद निर्णय घेतला आहे. नवनिर्वाचित अध्यक्ष गांगुलीनं आता देशाला ऑलिम्पिक स्पर्धेत पदक जिंकून देणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्याचा निर्णय घेतला आहे.
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील मालिकेचा दुसरा कसोटी सामना कोलकाताच्या इडन गार्डनवर होणार आहे. या कसोटी सामन्यादरम्यान बीसीसीआयतर्फे अभिनव बिंद्रा, मेरी कोम आणि पी. व्ही सिंधू यांचा सत्कार करणार आहे. बेंगाली डेलीनं दिलेल्या वृत्तानुसार गांगुली म्हणाला,''ऑलिम्पिक स्पर्धांमध्ये देशाचा तिरंगा डौलानं फडकावणाऱ्या खेळाडूंचा सत्कार करण्याचा आम्ही विचार करत आहोत. अभिनव बिंद्रा, मेरी कोम आणि पी.व्ही सिंधू यांचा इडन कसोटी दरम्यान सत्कार करण्यात येईल.''
भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यातील कसोटी मालिकेला 14 नोव्हेंबरपासून सुरुवात होणार आहे. या मालिकेतील दुसरा सामना कोलकाता येथे खेळवण्यात येईल. विशेष म्हणजे हा सामना डे नाईट खेळवण्याचा प्रस्ताव गांगुलीनं ठेवला आहे. त्यासाठी बीसीसीआयला बांगलादेश क्रिकेट मंडळाच्या होकाराची प्रतीक्षा आहे.
भारताला ऑलिम्पिक स्पर्धेत पहिले आणि एकमेव वैयक्तिक सुवर्णपदक जिंकून देण्याचा मान नेमबाज अभिनव बिंद्राला जातो. शिवाय बॅडमिंटनमध्ये पी. व्ही. सिंधूनं ऑलिम्पिक रौप्य आणि जागतिक स्पर्धेत भारताला पहिले सुवर्णपदक जिंकले आहे. मेरी कोमने बॉक्सिंगच्या जागतिक स्पर्धेत सर्वाधिक 8 पदक जिंकण्याचा पराक्रम केला आहे.
गांगुली आणि द्रविड यांच्यादरम्यान होणार चर्चा; क्रिकेटच्या भविष्यातील योजनांबाबत रणनीतीराष्ट्रीय संघात प्रदीर्घ काळ एकत्र प्रतिनिधित्व करणारे सौरव गांगुली आणि राहुल द्रविड अनुक्रमे बीसीसीआय अध्यक्ष आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी प्रमुख (एनसीए) म्हणून भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी बुधवारी बेंगळुरूमध्ये एकत्र येतील. द्रविडने जुलैमध्ये एनसीएचे प्रमुखपद सांभाळले. त्याने या संस्थेसाठी भविष्यातील योजना तयार केलेली आहे. ज्यावेळी या दोन माजी कर्णधारांची भेट होईल त्यावेळी द्रविड आपली योजना शेअर करेल. या बैठकीत बीसीसीआयचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी सहभागी होतील. ३० ऑक्टोबला होणाऱ्या बैठकीत एनसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुफान घोषही सहभागी होतील.