भारतानं महिला विश्वचषकाचं यजमानपद नाकारलं; बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले...

Women's T20 World Cup : राजकीय अस्थिरतेमुळे बांगलादेशमध्ये होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचं काय होणार? असा प्रश्न क्रिकेट वर्तुळात चर्तेत आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 15, 2024 12:43 PM2024-08-15T12:43:25+5:302024-08-15T12:44:48+5:30

whatsapp join usJoin us
BCCI general secretary Jay Shah reveals why India are not keen on hosting 2024 Women's T20 World Cup, pink-ball Tests | भारतानं महिला विश्वचषकाचं यजमानपद नाकारलं; बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले...

भारतानं महिला विश्वचषकाचं यजमानपद नाकारलं; बीसीसीआयचे सचिव जय शाह म्हणाले...

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

Women's T20 World Cup : नवी दिल्ली : महिला टी-२० विश्वचषकाचं यजमानपद स्वीकारण्यास भारतानं नकार दिला आहे. बीसीसीआयचे सचिव जय शाह यांनी याबाबत खुलासा केला आहे. या वर्षी ऑक्टोबरमध्ये बांगलादेशमध्ये महिला टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार आहे. दरम्यान, सद्यस्थितीत बांगलादेशात असंतोष पसरला आहे. सध्या राजकीय अस्थिरता असून अराजकतेचं वातावरण निर्माण झालं आहे. 

विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला हिंसक वळण लागल्यानंतर बांगलादेशाच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आणि त्यांना सुरक्षेच्या कारणास्तव देश सोडला लागला. आता बांगलादेशात अंतरिम सरकार आहे. त्यामुळे राजकीय अस्थिरतेमुळे बांगलादेशमध्ये होणाऱ्या महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचं काय होणार? असा प्रश्न क्रिकेट वर्तुळात चर्तेत आहे. 

बीसीसीआय सचिव जय शहा यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीत महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाबाबत भाष्य केलं आहे. जय शाह म्हणाले की, "आम्ही भारतात महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेच्या यजमानपदाची विनंती नाकारली आहे. ही विनंती बांगलादेश क्रिकेट बोर्डानं केली होती. आम्ही पुढच्या वर्षी महिला एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेचे यजमान आहोत. त्यामुळं आम्ही सलग विश्वचषक स्पर्धेचे यजमान होऊ, असे कोणतेही संकेत द्यायचे नाहीत", असंही जय शाह यांनी सांगितलं.

दरम्यान, बांगलादेशमधील सध्याची परिस्थिती पाहता महिला टी-२० विश्वचषक स्पर्धा होणार की नाही, याबाबत शंका व्यक्त करण्यात येत आहे. बांगलादेशऐवजी महिला टी-२० विश्वचषक स्पर्धा दुसऱ्या देशात खेळवला जाण्याची चर्चा सुरू आहे. त्यासाठी भारत, श्रीलंका आणि युएईची नावं समोर येत आहेत. भारतात क्रिकेटसाठी सर्वोत्तम सुविधा असल्यानं तयारीला फारसा वेळ लागणार नाही म्हणून भारताचं नाव घेतलं जात आहे.

जर बांगलादेशनं महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेचं यजमानपद भूषवलं नाही तर ही स्पर्धा श्रीलंका, युएईमध्ये होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. श्रीलंकेत ऑक्टोबर महिन्यात पाऊस पडतो. यामुळं युएईत स्पर्धा भरवली जाण्याची शक्यता दाट आहे. नुकतंच श्रीलंकेनं महिला टी २० आशिया कपचं यजमानपद भूषवलं होतं. ही स्पर्धा महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेच्या तयारीचा भाग मानली जात होती.

Web Title: BCCI general secretary Jay Shah reveals why India are not keen on hosting 2024 Women's T20 World Cup, pink-ball Tests

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.