भारतीय संघाचा प्रमुख गोलंदाज जसप्रीत बुमराह दुखापतीतून सावरण्यासाठी इंग्लंडमध्ये जाणार आहे. बुमराहनं पाठिच्या खालच्या भागातील हाडाला फ्रॅक्चर झाल्यामुळे दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी मालिकेतून माघार घेतली. ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात तो इंग्लंडला रवाना होणार आहे. आता आफ्रिकेपाठोपाठ आणखी एका कसोटी मालिकेत बुमराह खेळणार नसल्याचे संघ व्यवस्थापनाकडून सांगण्यात येत आहे.
IANSला संघ व्यवस्थापनातील सूत्रांनी सांगितले की,'' बांगलादेशविरुद्धची मालिका ही कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे लक्ष्य नाही. त्यामुळे बुमराहने पूर्णपणे तंदुरूस्त व्हावे अशी दोघांची इच्छा आहे. त्यामुळे बांगलादेशविरुद्धच्या कसोटी मालिकेतही तो खेळणार नाही. 2020चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप हे टीम इंडियाचे लक्ष्य आहे आणि त्यासाठी बुमराहला तंदुरुस्त ठेवणे, महत्त्वाचे आहे.''
''वेस्ट इंडिजविरुद्धच्या मर्यादित षटकांच्या मालिकेतून तो कमबॅक करू शकतो. बुमराहच्या बाबतीत संघ व्यवस्थापनाला कोणताही शॉर्टकट घ्यायचा नाही. पुर्णपणे तंदुरुस्त झाल्यानंतर त्याचे पुनरागमन होईल. त्यामुळे बांगलादेश मालिकेपर्यंत तो बरा होण्याची शक्यता कमी आहे,'' असे सूत्रांनी सांगितले.
घरच्या मैदानावर भारतीय संघ सलग 11 कसोटी मालिका जिंकण्याचा पराक्रम करण्यासाठी सज्ज झाले आहेत. पहिला कसोटी सामना 2 ऑक्टोबरपासून सुरू होणार आहे. बुमराहच्या दुखापतीबाबद बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने सांगितले की,''ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात बुमराह इंग्लंडला जाणार आहे. त्याच्यासोबत आशिष कौशिक असणार आहे. बुमराहला सर्वोत्तम वैद्यकिय सेवा मिळेल, याची काळजी ते घेतील.''
बुमराहने 12 कसोटीत 62 विकेट्स घेतल्या आहेत. पण या दुखापतीमुळे तो 3 ते 6 महिने क्रिकेटला मुकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.