नवी दिल्ली : गुरूवारी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) दक्षिण आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा केली. भारतीय संघ सध्या मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध पाच सामन्यांची ट्वेंटी-२० मालिका खेळत आहे. ही मालिका संपताच टीम इंडिया दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाणार आहे. १० डिसेंबरपासून सुरू होणाऱ्या आफ्रिका दौऱ्यासाठी टीम इंडियाची घोषणा झाली आहे. आफ्रिकेच्या धरतीवर भारतीय संघ वन डे, ट्वेंटी-२० आणि कसोटी अशा तीन मालिका खेळणार आहे. भारताच्या वन डे संघाची धुरा लोकेश राहुल, ट्वेंटी-२० संघाचे कर्णधारपद सूर्यकुमार यादव आणि कसोटी संघ रोहित शर्माच्या नेतृत्वात असणार आहे.
दरम्यान, कसोटी संघात अजिंक्य रहाणे, चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव यांना संधी मिळेल, असे अपेक्षित होते. पण, बीसीसीआयने कसोटी संघात देखील काही नव्या चेहऱ्यांना आजमावले. खरं तर ट्वेंटी-२० आणि वन डे संघातून विश्रांती घेत असलेले रोहित शर्मा आणि विराट कोहली आता थेट कसोटी मालिकेत दिसणार आहेत.
रहाणेसह तीन जणांना डच्चू
ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात मराठमोळ्या अजिंक्य रहाणेने चमकदार कामगिरी केली होती. पण, त्यानंतर झालेल्या वेस्ट इंडिज दौऱ्यात रहाणेला काही खास कामगिरी करता आली नाही. तर, अनुभवी चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव यांना देखील भारतीय संघात स्थान मिळवण्यासाठी आगामी काळात 'कसोटी' करावी लागणार आहे. कारण यांना देखील आफ्रिका दौऱ्यासाठी संधी मिळालेली नाही.
दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी भारताचा कसोटी संघ -
रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, ऋतुराज गायकवाड, इशान किशन, लोकेश राहुल, रविचंद्रन अश्विन, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, मोहम्मद सिराज, मुकेश कुमार, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, प्रसिद्ध कृष्णा.
कसोटी मालिकेचे वेळापत्रक
- २६ ते ३० डिसेंबर - दुपारी १.३० वाजल्यापासून
- ३ ते ७ जानेवारी - दुपारी १.३० वाजल्यापासून