Asia Cup 2023: आशिया चषक पाकिस्तानमध्ये न खेळवण्याच्या बीसीसीआयच्या भूमिकेला श्रीलंका क्रिकेट बोर्ड व बांगलादेश क्रिकेट बोर्डाने पाठिंबा दिला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाला हा मोठा धक्का असल्याचे म्हटले जात आहे. यंदाची आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानात होणार आहे, परंतु भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने ( BCCI) भारतीय संघाला पाकिस्तानात न पाठवण्याचा निर्णय घेतल्याने PCB ची कोंडी झाली आहे. त्यांनी नानातऱ्हेच्या धमक्या देऊन पाहिल्या, परंतु BCCI आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने आता आशिया चषक पाकिस्तानाबाहेर जाणार आहे. त्यात श्रीलंका व बांगलादेश यांनीही बीसीसीआयला पाठिंबा दिल्याने PCBची अधिक अडचण झाली आहे.
Geo Sports ने वृत्त दिले आहे की, बांगलादेश व श्रीलंका यांनीही आशिया चषक स्पर्धा पाकिस्तानाबाहेर खेळवण्यात यावी अशी इच्छा व्यक्त केली आहे. BCCIच्या भूमिकेनंतर PCB ने आशिया चषक स्पर्धेसाठी हायब्रिड मॉडेल जाहीर केले होते. त्यानुसार पाकिस्तानकडे आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद राहिल, परंतु भारताचे सर्व सामने संयुक्त अरब अमिराती येथे होती, परंतु हेही अद्याप मान्य केले गेलेले नाही.
आशिया चषक पाकिस्तानबाहेर गेली तर पाकिस्तान यात सहभाग घेणार नसल्याचे PCB चे अध्यक्ष नजम सेठी यांनी म्हटले आहे. त्यावरही आशियाई क्रिकेट परिषदेने पाकिस्तानला वगळून संयुक्त अरब अमिराती संघाचा समावेश करून आशिया चषक खेळवण्याचा विचार सुरू केला आहे. पाकिस्तान नसल्याने होणारा आर्थिक तोटा भविष्यातील स्पर्धांमध्ये भरून काढला जाईल, असा विश्वास जय शाह यांनी ब्रॉडकास्टर्सना दिला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आशियाई क्रिकेट परिषदेच्या बैठकीत BCCI ने हा मुद्दा उचलून धरावा अशा सूचना नरेंद्र मोदी सरकारने दिल्या आहेत. PCB अध्यक्ष सेठी यांनी पाकिस्तान भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेत खेळणार नसल्याची धमकी दिली होती, परंतु त्यांनी नंतर भूमिका बदलली. सेठी वन डे वर्ल्ड कपसाठी पाकिस्तानचा संघ भारतात पाठवण्यासाठी तयार आहेत. पण त्यासाठी त्यांना BCCIचे सचिव जय शाह यांच्याकडून लेखी हमी हवी आहे की, २०२५ च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारत त्यांच्या देशात अर्थात पाकिस्तानमध्ये सहभागी होईल.