Join us  

BCCI Prize Money to Stadiums, IPL 2022: BCCI कडून पदड्यामागील हिरोंचा सन्मान; स्टेडियमच्या ग्राऊंड्समेन आणि पिच क्युरेटर्सना मिळून १.२५ कोटींचे बक्षिस जाहीर!

वानखेडे, डीवाय पाटीलसह सर्व सहा स्टेडियममधील स्टाफला बक्षीस जाहीर

By ऑनलाइन लोकमत | Published: May 30, 2022 7:54 PM

Open in App

BCCI Prize Money to Stadiums, IPL 2022: आयपीएलच्या फायनलमध्ये गुजरात टायटन्सने विजेतेपद पटकावले. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखालील या संघाने पहिल्या हंगामातच राजस्थान रॉयल्सचा ७ विकेट्स राखून पराभव केला. तब्बल २ महिने चाललेल्या IPL स्पर्धेची रविवारी सांगता झाली. या २ महिन्यांच्या कालावधीत शेवटचा आठवडा वगळता दररोज सामने खेळवले गेले. साखळी फेरीतील सामने मुंबई आणि पुण्याच्या मैदानात तर प्ले ऑफचे सामने इडन गार्डन्स आणि नरेंद्र मोदी स्टेडियमवर रंगले. हे सामने सुरळीत पार पाडण्यात मोलाचा वाटा असणाऱ्या स्टेडियम व्यवस्थापनाचा BCCI ने आज सन्मान केला. एकूण सहा स्टेडियममधील ग्राउंड स्टाफ आणि पिच क्युरेटर्सना मिळून BCCIने १.२५ कोटींचे बक्षीस जाहीर केले. सचिव जय शाह यांनी या संदर्भातील घोषणा केली.

बीसीसीआयच्या वतीने जय शाह यांनी लिहिले की, IPL 2022 मध्ये झालेले सर्व सामने उत्तम प्रकारे पार पाडण्यात स्टेडियम व्यवस्थापनाचा सिंहाचा वाटा आहे. त्यांचे पडद्यामागील हिरो म्हणजे ग्राउंड स्टाफ आणि पिच क्युरेटर्स यांनी चोख व्यवस्था ठेवली. त्यामुळे स्पर्धा खूप रंगतदार झाली. त्यांच्या या कर्तव्याला सलाम करण्याच्या दृष्टीने सर्व सहा स्टेडियममधील ग्राउंड स्टाफ आणि पिच क्युरेटर्सना BCCIच्या वतीने एकूण १.२५ कोटींचे बक्षीस जाहीर करण्यात येत आहे. सर्वाधिक सामने खेळवल्या जाणाऱ्या मुंबईतील सीसीआयचे ब्रेबॉर्न स्टेडियम, वानखेडे मैदान, नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियम आणि पुण्यातील एमसीए स्टेडियम यांना प्रत्येकी २५ लाखांचे बक्षिस दिले जात आहे. तर प्ले ऑफचे सामने खेळवल्या जाणाऱ्या कोलकाताच्या इडन गार्डन्स आणि अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममधील स्टाफला प्रत्येकी १२.५० लाखांचे इनाम जाहीर करण्यात येत आहे.

टॅग्स :आयपीएल २०२२बीसीसीआयनरेंद्र मोदी स्टेडियमजय शाह
Open in App