IPL 2024 : कोलकाता नाईट रायडर्सचा कर्णधार श्रेयस अय्यरला ( Shreyas Iyer) इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये षटकांची गती संथ राखल्यामुळे दंड भरावा लागला आहे. शुबमन गिल, रिषभ पंत आणि संजू सॅमसन यांच्यानंतर हा दंड भरावा लागणारा श्रेयस चौथा कर्णधार आहे. KKRला मंगळवारी राजस्थान रॉयल्सविरुद्धच्या सामन्यात पराभव पत्करावा लागला आणि या सामन्यात स्लो ओव्हर रेटमुळे श्रेयसला १२ लाखांचा दंड ठोठावण्यात आला आहे.
सो ओव्हर रेटमुळे केकेआरला दुसऱ्या डावातील शेवटच्या षटकात निर्धारित पाच क्षेत्ररक्षकांऐवजी चार क्षेत्ररक्षक ३० यार्ड वर्तुळाबाहेर उभे करावी लागले. 'आयपीएल आचारसंहितेच्या अंतर्गत आयपीएल स्लो ओव्हर रेट अंतर्गत ही त्याच्या संघाची हंगामातील पहिली चूक होती, त्यामुळे अय्यरला १२ लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे,''असे आयपीएलने सांगितले.
सामन्यात प्रथम कोलकाताने फलंदाजी करताना ६ बाद २२३ धावा केल्या. सुनील नारायणने ५६ चेंडूत दमदार १०९ धावा केल्या. त्याने १३ चौकार आणि ६ षटकार लगावले. दुसऱ्या बाजूने त्याला अपेक्षित साथ लाभली नाही. तरीही राजस्थानच्या पुढे २२४ धावांचे आव्हान ठेवण्यात कोलकाताला यश आले. या आव्हानाचा पाठलाग करताना जोस बटलरनेही एकाकी झुंज दिली. रियान पराग (३४) आणि रॉव्हमन पॉवेलने (२६) साथ देण्याचा प्रयत्न केला, पण त्यांना फारशी गती मिळू शकली नाही. जोश बटलरने मात्र शेवटपर्यंत सामना आपल्या नियंत्रणात ठेवला. बटलर ६० चेंडूंत ९ चौकार व ६ षटकारांसह नाबाद १०७ धावा केल्या आणि राजस्थानने २ विकेट्सने सामना जिंकला.