मुबंई : भारताच्या एका खेळाडूने निंदनीय कृत्य केल्याप्रकरणी त्याच्यावर बीसीसीआयने तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.
प्रत्येक स्पर्धेचे काही नियम असतात. त्याचबरोबर आपण एक खेळाडू म्हणून कसे वागायला हवे, हेदेखील प्रत्येकाला माहिती असायला हवे. खेळाचे काही नियम असतात, पण या खेळाडूने तर नियमांना हरताळ फासत वाईट गोष्ट केल्याचे समोर आले आहे. जेव्हा बीसीसीआयला ही गोष्ट समजली तेव्हा त्याच्यावर थेट तीन वर्षांची बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
बीसीसीआयच्या अध्यक्षपदी माजी कर्णधार सौरव गांगुली विराजमान झाल्यानंतर काही योग्य निर्णय पाहायला मिळाले. खेळ आणि खेळाडूंची प्रतिमा जपण्यासाठी गांगुलीने काही पावले उचलली आहेत. जो खेळाशी प्रतारणा करेल, त्याच्यावर कडक कारवाई करण्यात येईल, हे गांगुली यांनी आपल्या कृतीतून दाखवून दिले आहे.
भारताच्या एका खेळाडूने वयचोरी करण्याचा गुन्हा केला आहे. हा खेळाडू आपला जन्म १२ डिसेंबर २००१ या दिवशी झाल्याचे सांगत होता. त्यामुसार तो १९ वर्षांखालील संघात खेळत होता. पण त्याच्या शाळेतील दाखल्यामध्ये १० जून १९९६ ही जन्मतारीख दाखवत आहे आणि त्याच्या जन्माचा दाखलाही मिळालेला आहे. त्यामुळे वयचोरी करत या खेळाडूने खेळाला बदनाम केले आहे. त्यामुळे त्याच्यावर आता तीन वर्षांची बंदी घालण्यात आली आहे.
या खेळाडूचे नाव प्रिन्स राम निवास यादव, असे आहे. हा खेळाडू दिल्लीच्या संघातून खेळत होता. त्याचबरोबर या खेळाडूने दहावीची परीक्षाही पास केलेली असल्याचे समोर आले आहे.