BCCI Incentive Scheme, Team India IND vs ENG: भारतीय क्रिकेट नियामक मंडळ म्हणजेच BCCIने शनिवारी आपल्या खेळाडूंसाठी एक मोठी घोषणा केली. धर्मशाला येथे झालेल्या पाचव्या कसोटीत भारताने इंग्लंडला पराभूत करत मालिका ४-१ने जिंकली. विजयानंतर काही वेळातच सचिव जय शाह यांनी फेसबुकवर पोस्ट करून सांगितले की बोर्ड 'कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना' घेऊन येत आहे. कसोटी क्रिकेटला प्राधान्य देणाऱ्या खेळाडूंचा यात सन्मान करणे हा या योजनेचा उद्देश आहे. या योजनेतील काही तरतुदींमुळे सध्या संघात दोन खेळाडूंना याचा लाभ मिळणार आहे. जाणून घेऊया त्याबद्दल.
कोणत्या २ खेळाडूंना फायदा?
BCCIच्या या योजनेचा फायदा चेतेश्वर पुजारा आणि उमेश यादव यांना होणार आहे. बीसीसीआयने सांगितले की, ही योजना २०२२-२३ हंगामापासून लागू आहे. या काळात भारताने सहा कसोटी सामने खेळले. चेतेश्वर पुजारा या काळात सहाच्या सहा सामन्यात प्लेईंग 11 मध्ये होता. उमेश यादवने २०२२-२३ हंगामात चार सामने खेळले, पण सहाही सामन्यांमध्ये तो संघाचा भाग होता.
कोणाला किती पैसे मिळणार?
ठरलेल्या काळात पुजाराने सर्व सहा सामने खेळले. अशा स्थितीत त्याला या सहा सामन्यांसाठी प्रत्येक सामन्यासाठी १५ लाख रुपये निश्चित फी मिळणार आहे. याशिवाय प्रत्येक सामन्यासाठी त्याला ४५ लाख रुपये वेगळे मिळतील. म्हणजेच पुजाराला गेल्या मोसमासाठी एकूण ३ कोटी ६० लाख रुपये मिळतील. उमेश यादवने २०२२-२३ हंगामात चार सामने खेळले, पण सहाही सामन्यांमध्ये तो संघाचा भाग होता. अशा स्थितीत दोन सामन्यांमध्ये प्लेइंग-11 मध्ये त्याचा समावेश नसला तरी त्याला त्या दोन प्रति सामन्यासाठी २२.५ लाख रुपये मिळतील. तर चार सामन्यांमध्ये प्लेइंग-11चा भाग असल्यामुळे त्याला प्रति सामन्यासाठी ४५ लाख रुपये मिळतील. म्हणजेच त्याला एकूण तीन कोटी रुपये मिळतील.