भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) भारताच्या वरिष्ठ महिला संघाच्या प्रशिक्षकपदासाठी अर्ज मागवले आहेत. गोलंदाजी प्रशिक्षक आणि क्षेत्ररक्षण प्रशिक्षक या पदांसाठी बीसीसीआयने जाहीरात काढली आहे. त्यामुळे हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वातील महिला संघाला लवकरच नवीन प्रशिक्षक मिळणार आहे. या प्रशिक्षकपदांसाठी १० ऑगस्ट २०२३ रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या पदांसाठी बीसीसीआयने काही पात्रता अटी देखील ठेवल्या आहेत. लक्षणीय बाब म्हणजे दोन्हीही प्रशिक्षकांचा कार्यकाळ हा दोन वर्षांचा असेल.
प्रशिक्षकपदासाठी आवश्यक बाबी -
- विविध संस्कृती आणि पार्श्वभूमीतील लोकांसोबत काम करण्याची क्षमता.
- टीमची उद्दिष्टे साध्य करण्यासाठी इतरांसोबत सहकार्याने काम करणे आवश्यक.
- संघातील समस्या सोडवून त्यावर तोडगा काढणे आणि दबावाखाली सर्वोत्तम निर्णय घेण्याची क्षमता असणे आवश्यक.
- इंग्रजी भाषेचे पुरेपुर ज्ञान असणे आवश्यक आणि बोलण्याची क्षमता.
पात्रता, अटी अन् अनुभव
- आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताचे किंवा इतर कोणत्याही देशाचे प्रतिनिधित्व केले असले पाहिजे.
- किमान एनसीए लेव्हल 'बी' प्रमाणित प्रशिक्षक किंवा प्रतिष्ठितांकडून प्रमाणपत्र असणे आवश्यक आहे.
- किमान १ हंगाम किंवा ट्वेंटी-२० कालावधीसाठी आंतरराष्ट्रीय संघाला प्रशिक्षण देण्याचा अनुभव असावा
- खेळाची संपूर्ण माहिती किंवा उच्च स्तरावर खेळण्याचा/प्रशिक्षणाचा अनुभव
दरम्यान, संघासोबत प्रवास करण्यासाठी प्रशिक्षक उपलब्ध असणे अपेक्षित आहे. तसेच संघातील खेळाडूंना वेळोवेळी मार्गदर्शन करणे, त्यांच्या समस्या सोडवणे, सामन्याचे निरिक्षण करून खेळाडूंच्या चुका त्यांच्या निदर्शनास आणून देणे आणि त्यावर तोडगा काढणे अशा काही प्रमुख जबाबदाऱ्या प्रशिक्षकांवर असणार आहेत. खरं तर आगामी काळात भारतीय महिला संघ आशिया क्रीडा स्पर्धेत खेळणार आहे. त्यामुळे या मोठ्या स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर बीसीसीआयने खेळाडूंच्या मागणीची दखल घेतल्याचे दिसते. कारण बांगलादेश दौऱ्यावर असताना भारताची उप कर्णधार स्मृती मानधनाने आम्हाला प्रशिक्षकाची गरज असल्याचे म्हटले होते.