Rohit Sharma vs BCCI : India Squad NZ T20 Series : मी ट्वेंटी-२० क्रिकेट सोडू इच्छित नाही, असे भारतीय कर्णधार रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या पहिल्या वन डे सामन्यापूर्वी (IND VS SL) स्पष्ट केले. पण, रोहितचे विधान BCCI ला आवडलेले नाही आणि त्यांनी त्यांची भूमिका स्पष्ट केली. बीसीसीआयने विराट कोहली आणि रोहित यांना आधीच सांगितले होते की त्यांना ट्वेंटी-२० संघात आता संधी देऊ इच्छित नाही. पण, तरीही रोहितने काल गुवाहाटी येथे अजूनही ट्वेंटी-२० न खेळण्याचा निर्णय घेतला नसल्याचे विधान केलं अन् वादाला तोंड फुटले.
भारतीय संघ पुढे न्यूझीलंडविरुद्ध तीन ट्वेंटी-२० सामन्यांची मालिका खेळणार आहे. या मालिकेसाठीच्या भारतीय संघात रोहित व विराट यांची निवड केली जाणार नसल्याचे बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने इनसाईडस्पोर्ट्सला सांगितले होते. या दोघांशिवाय भुवनेश्वर कुमार, आर अश्विन व मोहम्मद शमी यांचाही ट्वेंटी-२० संघासाठी विचार केला जाणार नसल्याचे सांगण्यात आले होते. पण, रोहितने आज अजूनही ट्वेंटी-२० क्रिकेटमधून माघार घेण्याचा निर्णय घेतलेला नाही, हे स्पष्ट केले. ''मी ट्वेंटी-२० फॉरमॅट सोडण्याचा निर्णय घेतलेला नाही,''असे रोहितने स्पष्ट केले.
रोहित शर्मा नुकत्याच झालेल्या श्रीलंकेविरुद्धच्या ट्वेंटी-२० मालिकेत खेळला नाही, कारण बांगलादेशविरुद्ध खेळल्या गेलेल्या वन डे मालिकेदरम्यान भारतीय कर्णधाराच्या हाताला दुखापत झाली होती. पण आता रोहित शर्माने श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत पुनरागमन केले आहे. रोहितच्या ट्वेंटी-२० मधील भविष्याबाबत लवकरच निर्णय घेतला जाईल. बीसीसीआयने चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील नवीन निवड समितीकडे ही जबाबदारी सोपवली आहे. रोहितसोबतच विराट कोहली, लोकेश राहुल, मोहम्मद शमी यांसारख्या वरिष्ठ खेळाडूंबाबतही निर्णय घेतला जाऊ शकतो.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"