पाकिस्तानात आशिया चषक ( Asia Cup) होणार की नाही याबाबत अजूनही अस्पष्टता आहे. भारतीय संघ पाकिस्तानात खेळण्यासाठी जाणार नाही, हे BCCI ने आधीच स्पष्ट केले. त्यानंतर पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचा तिळपापड झाला अन् त्यांनी भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कपमध्ये खेळणार नसल्याची हवा सोडली. आशिया चषकावर तोडगा म्हणून भारताचे सामने तटस्थ ठिकाणी खेळवण्याचा प्रस्ताव ठेवला गेला. त्यानंतरही PCB ची भूमिका बदलली नाही. PCB कोणत्याही परिस्थितीत आशिया चषक पाकिस्तानबाहेर खेळवण्यास तयार नाही. PCBची हा आडमुठेपणा ठेचण्यासाठी BCCIने मोठा डाव टाकला आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात बीसीसीआय आता पाच देशांची स्पर्धा भारतात खेळवणार आहेत. PCB आशिया चषक पाकिस्तानातच व्हावा या भूमिकेवर ठाम आहे आणि त्यामुळे आशिया चषक २०२३ स्पर्धा जवळपास रद्द होण्याच्या मार्गावर आहे. ऑक्टोबर २०२२ मध्ये बीसीसीआय अध्यक्ष जय शाह यांनी कोणत्याही परिस्थितीत भारतीय संघ आशिया चषकासाठी पाकिस्तानात जाणार नाही, हे जाहीर केले. जय शाह हे आशियाई क्रिकेट परिषदेचे अध्यक्षही आहेत. २०१८मध्ये आशिया चषक भारतात होणार होती, परंतु पाकिस्तानने येण्यास नकार दिल्याने ती संयुक्त अरब अमिराती येथे खेळवली गेली. असेच काहीचे यंदाही होणे अपेक्षित होते.
दोन आठवड्यापूर्वी शाह यांनी आशिया चषकाच्या तयारीबाबत PCB कडे अहवाल मागितला होता. ते म्हणालेले, आशिया चषक स्पर्धेतील भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याच्या ठिकाणाबाबत अजूनही कोणतीच माहिती देण्यात आलेली नाही.'' PCB त्यांच्या मतावर ठाम राहिल्यास आशिया चषक रद्द केला जाईल आणि बीसीसीआय त्या विंडोमध्ये पाच देशांना घेऊन भारतात एक स्पर्धा खेळवण्याच्या तयारीत आहेत.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"