आयपीएल २०२५ साठी होणाऱ्या मेगा लिलावाआधी किती खेळाडूंना संघासोबत कायम (Retention) ठेवता येईल? यासंदर्भातील निर्णय लवकरच स्पष्ट करण्यात येणार आहे. क्रिकबझच्या वृत्तानुसार, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) ऑगस्टच्या अखेरीस यासंदर्भातील नियमावली स्पष्ट करेल, अशी अपेक्षा आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळ आणि फ्रँचायझी संघ मालक यांच्यात विविध विषयावर चर्चा झाली. यात रिटेंशन पॉलिसीसंदर्भातील मुद्दा केंद्रस्थानी होता. सर्व फ्रँचायझी संघांचे मत ऐकून घेतल्यानंतर आता बीसीसीआय यासंदर्भात फायनल निर्णय घेणार आहे.
सर्वांच्या मतांचा विचार करुन अंतिम निर्णय घेणार बीसीसीआय
टाइम्स ऑफ इंडियाने दिलेल्या वृत्तानुसार, बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले आहेत की, खेळाडू रिटनेसंदर्भात आम्ही सर्व फ्रँचायझी संघांचे मत जाणून घेतले आहे. आमच्यासाठी अल्पसंख्यांक मंडळींचे मत देखील बहुमतात असणाऱ्या इतकेच महत्त्वपूर्ण आहे. दोन्ही बाजूंचा विचार करून बीसीसीआयचे पदाधिकारी अंतिम निर्णय घेतील. आगामी आयपीएल हंगामात सामन्यांची संख्या वाढणार का? हा प्रश्नही जय शाह यांना विचारण्यात आला होता. यासंदर्भात अद्याप कोणतीही गोष्ट ठरलेली नाही. खेळाडूंचा वर्कलोड आणि विंडो यागोष्टींचा विचार करून यासंदर्भात निर्णय घेतला जाईल, असे ते म्हणाले.
रिटेंशन पॉलिसीवर फ्रँचायझी संघांमध्ये नाही एकमत
आयपीएल २०२५ मेगा लिलावा आधी किती खेळाडूंना कायम ठेवायचे अर्थात रिटेन करायचे यासंदर्भात चांगलीच चर्चा रंगताना दिसत आहे. काही फ्रँचायझी संघांनी ६ ते ७ खेळाडूंना रिटेन करण्याची मुभा मिळावी, अशी इच्छा व्यक्त केली आहे. याशिवाय काही फ्रँचायझी संघांनी मेगा लिलावातील आरटीएम कार्डचा वापर करण्यावर जोर दिला आहे. याआधी २०१८ च्या मेगा लिलावात आरटीएमचा वापर करण्यात आला होता. शेवटी बीसीसीआय काय निर्णय घेणार ते रिटेशन पॉलिसी स्पष्ट झाल्यावरच कळेल.
मेगा लिलावाची रणनिती ठरवण्यासाठी रिटेंशन पॉलिसी ठरेल महत्त्वाची
खेळाडूंना रिटेन करण्याच्या नियमावलीशिवाय सॅलरी कॅप १०० कोटींचा आकड १२० कोटींपर्यंत वाढवण्यासंदर्भातही विचार केला जात आहे. त्याआधी रिटेंशन नियमावलीची घोषणा होईल, अशी अपेक्षा आहे. फ्रँचायझीसाठी ही एक महत्त्वपूर्ण घडामोड ठरेल. कारण या नियमालीवरूनच संघ बांधणीच्या रणनितीला सुरुवात होईल.