इंडियन प्रीमिअर लीगच्या 2020च्या सत्राची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. 2020च्या आयपीएलमध्ये संघ संख्या वाढणार असल्याची चर्चा रंगली होती. नव्या संघांसाठी बडे बडे उद्योगपती मैदानात उतरले असल्याची चर्चा आहे. आता आणखी एक नवीन अपडेट समोर येत आहे. इंडियन एक्सप्रेस या इंग्रजी वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार 1 एप्रिल ते 30 मे 2020 या कालावधीत आयपीएल स्पर्धा खेळवण्यात येणार आहे. त्यामुळे यंदाच्या लीगचा कालावधी वाढणार आहे.
भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) रात्रीच्या सामन्यांना अधिक पसंती देणार असल्यानं लीगचा कालावधी वाढणार आहे. प्रत्येक दिवशी केवळ एकच सामना खेळवला जावा, असा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. त्यामुळे डबल हेडर सामन्यांची संख्या कमी होईल. या संदर्भात बीसीसीआय ब्रॉडकास्टर आणि फ्रँचायझींशी चर्चा करत आहे.
ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धा ऑक्टोबर महिन्यात असल्यामुळे आयपीएल स्पर्धेसाठी बीसीसीआयला दोन महिन्यांचा कालावधी मिळणार आहे. त्याचा पुरेपुर उपयोग करून घेण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. त्यामुळे आयपीएलच्या कालावधीत वाढ करण्यात येईल. सायंकाळी 4 वाजता खेळवण्यात येणाऱ्या सामन्यांवर मुंबई इंडियन्सने सर्वप्रथम आक्षेप घेतला होता. या सामन्यांना प्रेक्षकांची संख्याही कमी असते. अनेक लोकं कार्यालयीन काम संपवून मॅच पाहायला येणं पसंती करतात, त्यामुळे 8च्या सामन्यांना गर्दी असते, असे मत त्यांनी मांडले होते.
शिवाय काही खेळाडूंनीही 4 वाजत्याच्या सामन्याबद्दल तक्रार केली होती. आयपीएल एप्रिल-मे मध्ये खेळवली जाते आणि त्यावेळी भारतातील हवामान उष्ण असते. त्याचा खेळाडूंना फटका बसतो. दुसरीकडे 8चा सामना संपायला उशीर होत असल्याने सार्वजनिक वाहतुकीवर परिणाम होतो. त्यामुळे हा सामना 7 वाजता खेळवावा असेही मत मांडले गेले आहे. या संदर्भातला निर्णय आयपीएलच्या गव्हर्निंग मिटींगमध्ये घेण्यात येईल.