इंडियन प्रीमिअर लीगच्या ( आयपीएल 2020) 13व्या मोसमाचा मार्ग मोकळा झाला. सुरुवातीला आयपीएल 26 सप्टेंबरपासून सुरू होईल, अशी चर्चा रंगली होती. पण, गव्हर्निंग काऊंसिलचे चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी ही स्पर्धा 19 सप्टेंबर ते 8 नोव्हेंबर या कालावधीत संयुक्त अरब अमिराती ( यूएई) येथे रंगणार असल्याचे जाहीर केले. पण, आता 8 नोव्हेंबरला होणारी फायनल पुढे ढकलण्यात येणार असल्याचे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ ( बीसीसीआय) च्या सूत्रांनी सांगितले. यामागे एक महत्त्वाचं कारण आहे.
आयपीएलची सुरुवातीची तारीख बदलणे शक्य नाही, परंतु आयपीएलचा कालावधी 51 दिवसांवरून 53 दिवसांवर जाणार आहे. ही सर्व प्रार्थमिक चर्चा आहे, 2 ऑगस्टला होणाऱ्या बैठकीत अंतिम निर्णय घेतला जाईल. आता आयपीएल फायनल 8 नोव्हेंबर ऐवजी 10 तारखेला होणार आहे. त्यानंतर भारतीय खेळाडू थेट तिथूनच ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रवाना होणार आहे. पण, आठ संघांमधील जे खेळाडू ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहेत, त्यांना फायनलपर्यंत यूएईत थांबवण्याची जबाबदारी बीसीसीआयला घ्यावी लागणार आहे.
दरम्यान, आयपीएल संचालन परिषदेची बैठक २ ऑगस्ट रोजी होत आहे. क्रीडा मंत्रालयाने आयपीएलचे आयोजन यूएईत करण्यासाठी बीसीसीआयला परवानगी बहाल केली. बीसीसीआयला आता गृह आणि परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाची परवानगी हवी आहे. क्रीडा मंत्रालयाच्या वरिष्ठ अधिकाºयाने आयपीएलचा प्रस्ताव मान्य केल्याचे सांगितले.
बीसीसीआयच्या एका ज्येष्ठ अधिकाºयानुसार आयपीएल संचालन परिषदेच्या बैठकीत बीसीसीआयचे सर्व वरिष्ठ अधिकारी सहभागी होतील. त्यात अध्यक्ष सौरव गांगुली, सचिव जय शाह यांचाही समावेश असेल. बैठकीत विविध हितधारकांशी संबंधित मुद्यांवर चर्चा केली जाईल. गांगुली आणि शाह यांचा बीसीसीआयचे अध्यक्ष तसेच सचिवपदाचा कार्यकाळ संपला आहे. तथापि या दोघांनी लोढा समितीच्या ‘कुलिंग ऑफ’पिरियडच्या अटीतून सूट मिळण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. १७ ऑगस्ट रोजी या याचिकेवर नुसावणी होणार आहे.