मुंबई : भारत आणि पाकिस्तान यांच्यातील वर्ल्ड कप स्पर्धेचा सामना होणार की नाही, याबाबत अनेक तर्कवितर्क मांडले जात आहेत. पुलवमा दशहतवादी हल्ल्यानंतर भारतीय संघाने वर्ल्ड कप स्पर्धेत पाकिस्तानसोबत खेळू नये, अशी मागणी जोर धरत आहे. पण, केंद्र सरकारने तसे आदेश दिल्यास पाकविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकू असा पवित्रा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) घेतला आहे. मात्र, आता पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत खेळू देऊ नये अशी मागणी बीसीसीआय आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडे ( आयसीसी) करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. इंग्लड आणि वेल्स येथे 30 मे पासून वर्ल्ड कप स्पर्धा खेळवण्यात येणार आहे आणि 16 जूनला भारत-पाकिस्तान सामना होणार आहे.
'इंडिया टुडे'ने दिलेल्या वृत्तानुसार प्रशासकीय समितीचे प्रमुख विनोद राय यांनी बीसीसीआयचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल जोहरी यांना आयसीसीला पत्र लिहिण्यास सांगितले आहे. त्यात पाकिस्तान संघाला वर्ल्ड कप स्पर्धेत खेळण्यापासून रोखावे अशी विनंती करण्यास राय यांनी सुचविले आहे. पुलवामा भ्याड हल्ल्यात भारताचे 40 जवान शहीद झाले आहेत. दरम्यान, भारताच्या अनेक माजी खेळाडूंनीही भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकविरुद्ध खेळू नये असाच सूर धरला आहे. त्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डात ( पीसीबी) चिंतेचं वातावरण पसरलं आहे. त्यामुळे दुबईत होणाऱ्या आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या बैठकीदरम्यान या मुद्यावर पीसीबी भारतीय क्रिकेट नियामक मंडळाशी ( बीसीसीआय) चर्चा करणार असल्याची, माहिती एका वेबसाइटने दिली होती. क्रिकेट आणि राजकारण यांची सरमीसळ करू नये, असे पीसीबीनं आधीच स्पष्ट केलं होतं. पण, पुलवामा हल्ल्यानंतर भारतीय संघ वर्ल्ड कप स्पर्धेत पाकविरुद्धच्या सामन्यात बहिष्कार टाकण्याची शक्यता वाढली आहे. त्याच पार्श्वभूमीवर पीसीबी दुबईत बीसीसीआयशी चर्चा करणार असल्याचे समजते. 2008 नंतर उभय देशांत द्विदेशीय मालिका झालेली नाही. मात्र, आयसीसीच्या स्पर्धांमध्ये भारत-पाक सामने झाले आहेत. 2017च्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीत आणि 2018च्या आशिया चषक स्पर्धेत भारत-पाक यांच्यात सामने झाले होते.
वर्ल्ड कपमधील पाकविरुद्धच्या सामन्यावरील बहिष्काराच्या मागणीवर बीसीसीआयच्या सूत्रांनी सांगितले की,'' वर्ल्ड कप स्पर्धा नजीक आल्यानंतर याबाबतचे चित्र स्पष्ट होईल. या प्रकरणात आयसीसी काहीच करू शकत नाही. भारताने वर्ल्ड कपमध्ये पाकिस्तानविरुद्ध खेळू नये, असे सरकारला वाटत असेल तर आम्ही सामन्यावर बहिष्कार घालू. जर आम्ही खेळलो नाही, तर पाकिस्तानला गुण मिळतील आणि जर अंतिम सामन्यात पुन्हा ते समोर आले, तर त्यांना न खेळताच वर्ल्ड कप मिळेल. याबाबत आम्ही अद्याप आयसीसीसोबत संवाद साधलेला नाही.''