व्हीव्हीएस लक्ष्मण
आयपीएल अखेर स्थगित झाले. अशावेळी खेळाडूंना घरी पाठविण्याचा मुद्दा ऐरणीवर आहे. विशेषत: विदेशी खेळाडूंना मायदेशी कसे सुरक्षित पाठविता येईल, यासाठी बीसीसीआय गंभीरपणे प्रयत्न करीत आहे. त्यासाठी योजना आखली जात आहे. आयपीएलचे उर्वरित सामने कधी होणार? याचा विचार बाजूला ठेवावा. खेळाडूंना त्यांच्या कुटुंबीयांपर्यंत सुखरूप कसे पोहोचता येईल, या प्रयत्नांना प्राधान्य असावे.बायोबबल फुटला कसा? हा देखील गंभीर मुद्दा आहे. तणावपूर्ण वातावरणात मानसिक आणि शारीरिक आरोग्य जोपासण्यास प्राधान्यक्रम असायला हवा. एका शहरातून दुसऱ्या शहरात जाताना खेळाडूंनी कोरोना प्रोटोकॉलचे तंतोतंत पालन केले. तरीही सीएसके आणि केकेआरचे काही खेळाडू कोरोनाबाधित झाल्याचे ऐकून धक्का बसला. सनरायझर्सचेही दोन खेळाडू सामन्याच्या दिवशी सकाळी पॉझिटिव्ह आल्याने आमच्याही चिंतेत भर पडली होती.
रिद्धिमान साहा सामन्याच्या आदल्या दिवशी आजारी पडला. त्याला विलगीकरणात पाठविल्यानंतर रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. तो लवकर बरा होईल, अशी आशा करूया. यामुळे कुठे ना कुठे चूक नक्की झाली, हे मान्य करावेच लागेल. आता प्रश्न आहे, तो उर्वरित सामन्यांचा. त्याच्यात अतिघाई नको. सर्व फ्रॅन्चायजी, खेळाडू आणि बसीसीआयचे मतैक्य झाले, तरच हे आयोजन टी-२० विश्वचषकाआधी शक्य होऊ शकेल. तोवर समाजाच्या प्रत्येक घटकाला मदत देण्याचे प्रयत्न सुरू असावेत. सर्वांनी आपापल्या घरी सुरक्षित राहा, हीच माझी काळजी आहे. अत्यावश्यक काम असेल तरच घराबाहेर पडा, प्रोटोकॉलचे पालन करा, लस घ्या, अशी माझी विनंती आहे. संयुक्त प्रयत्नातून आम्हाला कोरोनाविरुद्धचा लढा जिंकायचा आहे. (गेम प्लान)