इंडियन प्रीमिअर लीग (IPL) च्या आगामी मेगा लिलावात बीसीसीआय संघ मालकांची मर्जी राखण्यासंदर्भात सकारात्मक विचार करत असल्याचे दिसते. क्रिकबझच्या वृत्तानुसार, मेगा लिलावाआधी फ्रँचायझी संघांना 6 खेळाडूंना संघात कायम ठेवण्याची म्हणजेच रिटेन करण्याची मुभा देण्याबाबत बीसीसीआय विचार करत आहे. याशिवाय राईट टू मॅच कार्ड (RTM) नुसार एक खास डावही फ्रँचायझींना खेळता येईल, असे दिसते. बीसीसीआयने याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
IPL संघ मालकांच्या मनातली गोष्ट
इंडियन प्रीमिअर लीग (IPL) स्पर्धेतील 10 फ्रँचायझी संघांनी आगामी 3 आयपीएल हंगामासाठी रिटेन करण्यात येणाऱ्या खेळाडूंच्या संख्येत वाढ करण्याची विनंती केली आहे. 10 फ्रेंचायझी संघांचे मत वेगवेगळे असले तरी बहुतांश संघ 5 ते 7 खेळाडूंना रिटेन करण्यासाठी इच्छूक आहेत. यात काही संघ असेही आहेत, ज्यांना सर्वच खेळाडूंना लिलावात आणायचे आहे. यासंदर्भात बीसीआय बहुमताच्या आकड्यानुसार, निर्णय घेण्याच्या विचारात असल्याचे दिसते. यासंदर्भात बीसीसीआयने अद्याप कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.
लिलावाआधी खेळाडू बूक करण्याचा डाव, फ्रँचायझीसाठी निश्चित फायद्याचा
खेळाडूचे नाव लिलावात आले तर एखाद्या खेळाडूसाठी किती बोली लागेल, सांगता येत नाही. पर्स मधील मर्यादा आणि लिलावात लागणारी मोठी बोली, यामुळे हवा तो खेळाडू मिळवणं फ्रँचायझीसाठी अधिक कठीण होऊन बसते. त्यामुळे आपल्या ताफ्यातील खेळाडू कायम ठेवून संघ बांधणीचा मार्ग सोपा करण्याच्या दृष्टीने फ्रँचायझीसाठी रिटेनच्या माध्यमातून खेळाडू आधीच बूक करण्याचा डाव निश्चितच फायद्याचा ठरतो. जाणून घ्या खेळाडू रिटेन करण्यासंदर्भातील सध्याचा नियम?
भारतीय क्रिकेट नियमामक मंडळाने (BCCI) 2021 पासून आयपीएल फ्रँचायझी संघासाठी जो रिटेनचा नियम लागू केलाय त्यानुसार, लिलावाआधी 4 खेळाडूंना फ्रँचायझी संघ रिटेन करू शकतात. यात 3 पेक्षा अधिक भारतीय किंवा 2 परदेशी खेळाडूंना पसंती द्यावी लागते. राईट टू मॅच (RTM) कार्डच्या माध्यमातून एक अवांतर खेळाडू संघात घेण्याचा डाव फ्रँचायझी संघाना खेळता येतो.
जर रिटेन खेळाडूंची संख्या वाढली तर फ्रँचायझी संघाना कसा होईल फायदा?
लिलावाआधी फक्त 4 खेळाडूंना कायम ठेवण्याचा निर्णय घेताना बहुतांश संघांची कोंडी होते. कारण 4 चांगले पर्याय निवडूनही मनात असूनही एखाद्या खेळाडूला कायम ठेवता येत नाही. लिलावात तो पुन्हा ताफ्यात घेता येईल, याची खात्री नसते. त्यामुळे बीसीसीआयने जर RTM सह 6 खेळाडू हा नियम लागू केला तर फ्रँचायझी संघांना पूर्वीच्या तुलनेत 3 अतिरिक्त खेळाडूंना लिलावाआधी संघात ठेवणं शक्य होईल.