Join us  

वृद्धीमान साहावर BCCI चा कारवाईचा बडगा?; स्पष्टीकरण मागणार 

द्रविड, गांगुली यांच्यावर साहाने केली होती टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2022 9:27 AM

Open in App

नवी दिल्ली : श्रीलंकेविरुद्ध राष्ट्रीय संघात स्थान न मिळाल्यामुळे मुख्य कोच राहुल द्रविड आणि बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांच्यावर केलेली टीका यष्टिरक्षक- फलंदाज वृद्धिमान साहा याला चांगलीच भोवणार अशी शक्यता वर्तविली जात आहे. बीसीसीआय आता त्याच्यावर कारवाईचा बडगा उगारण्याच्या तयारीत असून करारबद्ध असताना जाहीर वकतव्य कसे काय केले? याचे लेखी उत्तर त्याच्याकडून मागितले जाईल.  

गांगुलीने आपल्याला संघातून वगळले जाणार नाही, असे वचन दिले होते. त्याचवेळी द्रविडने  मला निवृत्तीचा सल्ला दिला असे खळबळजनक विधान करीत साहाने द्रविड आणि गांगुली यांना टार्गेट केले होते. साहाने बीसीसीआय करारातील नियमांचे उल्लंघन केल्याचे बोर्डाचे मत आहे.

बीसीसीआयने साहाला राष्ट्रीय करारात ब गटात  स्थान दिले आहे. या आधारे त्यांना वर्षाला तीन कोटी रुपये मिळतात. साहाने  प्रशिक्षक आणि बोर्ड अध्यक्षांविरुद्ध टिप्पणी करून कलम ६.३ चे उल्लंघन केले. बीसीसीआयच्या नियमांनुसार, खेळाडू मीडियामध्ये खेळ, अधिकारी, सामन्यादरम्यान घडलेली कोणतीही घटना, तंत्रज्ञानाचा वापर, खेळाडूंची निवड किंवा बीसीसीआयच्या विरोधात किंवा क्रिकेट खेळाला विरोध करणारी कोणतीही बाब मीडियापुढे उघड करू शकत नाही.

साहाने मीडियामध्ये प्रशिक्षक द्रविड, निवड समितीचे अध्यक्ष चेतन शर्मा आणि बोर्ड अध्यक्ष गांगुली यांच्या विरोधात टीका केली.  श्रीलंकेविरुद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारतीय संघ जाहीर झाल्यानंतर साहा सातत्याने वादात सापडला आहे. आधी त्याने द्रविड आणि गांगुली यांच्या विरोधात वक्तव्य केले. यानंतर एका पत्रकाराने त्याला मुलाखतीसाठी विचारले. साहाने प्रतिसाद न दिल्याने पत्रकाराने त्याची कधीही मुलाखत न घेण्याची धमकी दिली होती. यानंतर साहाने या चॅटचे स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर शेअर केले.

‘मध्यवर्ती करारात सहभाग असताना निवड समिती आणि बीसीसीआय पदाधिकाऱ्यांविरोधात जाहीर वक्तव्य का केले? या बाबतचा खुलासा मागविण्यासाठी बोर्डाकडून साहाला पाचारण केले जाईल.’ अरुण धूमल, कोषाध्यक्ष बीसीसीआय

टॅग्स :वृद्धिमान साहासौरभ गांगुलीराहुल द्रविडबीसीसीआय
Open in App