आयपीएल २०२० नंतर टीम इंडिया ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. निवड समितीनं नुकतंच या दौऱ्यासाठी वन डे , ट्वेंटी-20 आणि कसोटी संघांची घोषणा केली. या तीनही संघात रोहित शर्माचे ( Rohit Sharma) नाव नसल्यानं सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला. मुंबई इंडियन्सचा ( Mumbai Indians) कर्णधार रोहितला किंग्स इलेव्हन पंजाबविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली होती. त्यामुळे तो मागील तीन सामन्यांत बाकावर बसून आहे. पण, निवड समितीनं दुखापतीचं कारण सांगून संघाबाहेर बसवलेल्या रोहितचा सराव करतानाचा व्हिडीओ MIनं अपलोड केल्यानं नवा वाद सुरू झाला. त्यात आता रोहित ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार की नाही, याबाबतचे महत्त्वाचे अपडेट्स BCCIकडून मिळत आहेत.
रोहित शर्माची दुखापत एवढी गंभीर नाही, मग ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी ५ आठवड्यांचा कालावधी शिल्लक असताना त्याला का वगळले? टीम इंडियातून वगळ्याएवढी रोहितची दुखापत गंभीर आहे, मग तो अजून UAEत काय करतोय? तो बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत उपचारासाठी का रवाना झाला नाही? असे अनेक प्रश्न सध्या चर्चिले जात आहेत. त्यात आज तो खेळेल की नाही, यावरही संभ्रम आहेच. लोकेश राहुलचे कसोटी संघात पुनरागमन झाले असून मर्यादित षटकांच्या सामन्यांत रोहितच्या अनुपस्थितीत लोकेशकडे उपकर्णधारपद सोपवण्यात आले आहे.
टीम इंडियाचे फिजिओ नितिन पटेल यांनी ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी सर्व खेळाडूंच्या तंदुरुस्तीबाबत एक अहवाल बीसीसीआय व निवड समितीला दिला. ''पटेल यांनी सर्व खेळाडूंच्या तंदुरुस्तीचा वैद्यकिय अहवाल दिला. कोणता खेळाडू फिट आहे आणि कोणता नाही, हे फिजिओंनी सांगायचे असते आणि यात नवीन असे काहीच नाही. त्यानुसार रोहित दुखापतीमुळे संघ निवडीसाठी उपलब्ध नसल्याचे आम्हाला सांगण्यात आहे. पटेल यांनी दोन तज्ज्ञ डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हा अहवाल तयार केला. त्यात दोघांनीही रोहितला २-३ आठवड्यांची विश्रांती आवश्यक असल्याचे सांगितले,''अशी माहिती सूत्रांनी दिली.
नवीन अपडेट्स काय?बीसीसीआयची वैद्यकिय टीम रविवारी रोहित शर्माची दुखापत पाहणार आहेत. त्यानंतर तो ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी तंदुरुस्त आहे की नाही, याबबातचा अंतिम फैसला घेण्यात येईल.