Join us  

टीम इंडियाचा नवा कोच धोनी ठरवणार? BCCI कडून हालचालींना वेग, द्रविडची खुर्ची कोणाला?

टीम इंडिया आगामी काळात ट्वेंटी-२० विश्वचषकासारख्या मोठ्या व्यासपीठावर खेळणार आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: May 21, 2024 2:11 PM

Open in App

MS Dhoni News : भारतीय संघ आगामी काळात ट्वेंटी-२० विश्वचषकासारख्या मोठ्या व्यासपीठावर खेळणार आहे. भारतीय संघाचे विद्यमान प्रशिक्षक राहुल द्रविड यांचा कार्यकाळ संपुष्टात येणार आहे. त्यामुळे टीम इंडियाला लवकरच नवा प्रशिक्षक मिळणार आहे. यासाठी भारतीय संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची भूमिका महत्त्वाची असणार आहे. चेन्नई सुपर किंग्स आयपीएलमधून बाहेर झाली असून, धोनी त्याच्या घरी रांची येथे परतला आहे. अशातच बीसीसीआय माहीची संपर्क साधण्याच्या प्रयत्नात असल्याचे दिसते.

भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) प्रशिक्षकपदासाठी स्टीफन फ्लेमिंग यांच्याकडे पाहत आहे. यासाठी धोनीची भूमिका महत्त्वाची असणार आहे. धोनी बीसीसीआय आणि चेन्नईच्या संघ व्यवस्थापनाशी चर्चा करू शकतो. 'हिंदुस्तान टाइम्स'ने दिलेल्या वृत्तानुसार, न्यूझीलंडच्या संघाचे ३०३ सामन्यांमध्ये कर्णधारपद सांभाळणारे स्टीफन हे राहुल द्रविड यांची जागा घेऊ शकतात. स्टीफन फ्लेमिंग यांनी बीसीसीआयशी आयपीएलच्या सुरुवातीच्या चर्चेत दीर्घ आणि थकवणाऱ्या वेळापत्रकाबाबत सर्व काही स्पष्ट केले होते. स्टीफन यांनी केवळ ट्वेंटी-२० मधील प्रशिक्षकपदासाठी हिरवा सिग्नल दिल्याचे कळते. यानंतर बीसीसीआयने इतर पर्याय शोधण्यास सुरुवात केली आणि जस्टिन लँगर, गौतम गंभीर आणि महेला जयवर्धने यांच्याशी संपर्क साधण्यात आला. मात्र, अद्याप स्टीफन यांच्याशी चर्चा सुरू असल्याने धोनी समन्वयकाची भूमिका बजावू शकतो.

स्टीफन फ्लेमिंग मागील मोठ्या कालावधीपासून आयपीएलमध्ये प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत. पण, त्यांनी २०२७ पर्यंत दुसऱ्या कोणत्याही भूमिकेत दिसणार नसल्याचे स्पष्ट केले होते. २००८ मध्ये आयपीएलच्या पदार्पणाच्या हंगामात सलामीवीर म्हणून खेळणाऱ्या फ्लेमिंग यांनी २००९ पासून प्रशिक्षकपदाची धुरा सांभाळली. इतकेच नाही तर आयपीएल व्यतिरिक्त ते चेन्नई सुपर किंग्सच्या इतर फ्रँचायझींसोबतही दिसले आहेत. मेजर लीग क्रिकेटमधील टेक्सास सुपर किंग्स आणि एसए-20 मधील जॉबर्ग सुपर किंग्सच्या संघाचेही ते प्रशिक्षक आहेत. याशिवाय द हंड्रेडमधील सदर्न ब्रेव्हच्या मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी त्यांच्याकडे आहे. एकूणच स्टीफन यांनी व्यग्र वेळापत्रक पाहता केवळ ट्वेंटी-२० क्रिकेटला प्राधान्य दिले आहे. 

टॅग्स :महेंद्रसिंग धोनीभारतीय क्रिकेट संघबीसीसीआयराहुल द्रविड