भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमधील राजकीय संबंध जगजाहीर आहेत. पाकिस्तानातून दहशतवादी कृत्यांना मिळत असलेल्या खतपाणीमुळे भारताने शेजाऱ्यांशी सर्व संबंध तोडले आहेत. क्रिकेटच्या मैदानावरही उभय देशांमध्ये मालिका होत नाही. शिवाय पाकिस्तानात जाण्यास भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा ( बीसीसीआय) विरोध असल्यामुळे यंदाच्या आशिया चषक स्पर्धेचे यजमानपद पाकिस्तानला सोडवे लागले. त्यामुळे आता पाकिस्तान क्रिकेट मंडळानेही ( पीसीबी) डावपेच खेळण्यास सुरुवात केली आहे. इंडियन प्रीमिअर लीग ( आयपीएल) चा 13 वा मोसम कोणत्याही परिस्थितीत होऊ न देण्याचा निर्धार केल्याचा त्यांच्या कृतीतून दिसत आहे. पण, त्यांना क्रिकेटच्या सर्वात श्रीमंत संघटनेची म्हणजेच बीसीसीआयच्या ताकदीची कल्पना आहे. त्यामुळेच त्यांना एका गोष्टीची भीती वाटत आहे आणि त्यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( आयसीसी ) पुढे करून बीसीसीआयकडे लेखी हमी मागितली आहे.
2018मध्ये भारतात होणारा आशिया चषक संयुक्त अरब अमिराती येथे हवलण्यात आला. आता 2020च्या आशिया चषक स्पर्धेबाबतही तिच शक्यता आहे. दोन देशांमध्ये क्रिकेटचे सामने केवळ आयसीसीच्या स्पर्धआंमध्ये होत आहेत. आता आयपीएलच्या 13व्या मोसमाला विरोध केल्यानंतर बीसीसीआय पाकिस्तान क्रिकेट संघाच्या वर्ल्ड कप स्पर्धेतील सहभागात अडथळा निर्माण करू शकतो अशी भीती पीसीबीला वाटत आहे. 2021 चा ट्वेंटी-20 आणि 2023च्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भारताला मिळाले आहे. त्यामुळे त्या स्पर्धेत सहभागासाठी बीसीसीआयनं पाकिस्तानच्या खेळाडूंना व्हिसा मिळेल, याची लेखी हमी द्यावी अशी मागणी पीसीबीनं आयसीसीकडे केली आहे.
पीसीबीचे मुख्य कार्यकारी अधिकारी वसीम खान यांनी एका Cricket Baaz या यूट्यूब चॅनेलला दिलेल्या मुलाखतीत हा मुद्दा मांडला. ते म्हणाले,''2021 आणि 2023 मध्ये आयसीसी वर्ल्ड कप स्पर्धा भारतात होणार आहेत. त्या स्पर्धेत सहभाग घेण्याकरिता आमच्या खेळाडूंना कोणत्याही प्रकारची समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी आम्ही आयसीसीला बीसीसीआयकडून लेखी हमी घेण्याची मागणी केली आहे. पण, सद्यस्थितीत 2021चा ट्वेंटी-20 वर्ल्ड कप ऑस्ट्रेलियात होतो की भारतात हे पाहावे लागेल.''
यंदाच्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेवर कोरोनाचं संकट आहे. त्यामुळे यंदाची स्पर्धा रद्द करून ती 2022मध्ये खेळवली जाण्याची शक्यता आहे. पण, भारतात होणाऱ्या वर्ल्ड कप स्पर्धेत सहभाग घेण्यासाठी पाकिस्तानी खेळाडूंना व्हिसाच्या समस्येचा सामना करावा लागू शकतो, अशी भीती पीसीबीला वाटतेय. त्यासाठी त्यांनी आयसीसीकडे योग्य पाठपुरवठा करण्याची मागणी केली आहे.