भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने नवीन निवड समितीची घोषणा केली आहे. चेतन शर्मा यांना पुरुष क्रिकेट संघाचे मुख्य निवडकर्ता म्हणूनही कायम ठेवण्यात आले आहे. बीसीसीआयने गेल्या वर्षी टी-20 विश्वचषकातील खराब कामगिरीनंतर चेतन शर्मा यांच्या नेतृत्वाखालील समितीला बरखास्त केले होते. आता चेतन शर्मा पुन्हा मुख्य निवड समितीमध्ये असणार आहेत. बीसीसीआयने आज प्रसिद्धी पत्रक जारी करुन ही माहिती दिली आहे.
'क्रिकेट सल्लागार समितीने वैयक्तिक मुलाखतीसाठी 11 जणांची निवड केली. वैयक्तिक मुलाखतीच्या आधारे पाच सदस्यांची निवड करण्यात आली. चेतन शर्मा वगळता पाच सदस्यीय समितीमध्ये नवे चेहरे आहेत.
चेतन शर्मा
वेगवान गोलंदाज चेतन शर्माने भारतासाठी 23 कसोटी आणि 65 एकदिवसीय सामने खेळले आहेत आणि तो या पाच सदस्यीय संघातील सर्वात अनुभवी खेळाडू आहे. चेतन शर्माने कसोटीत 61, तर वनडेत 67 विकेट्स घेतल्या आहेत. 1987 च्या विश्वचषकात चेतन शर्माने न्यूझीलंडविरुद्ध अविस्मरणीय हॅटट्रिक केली.
शिव सुंदर दास
भारताचा माजी सलामीवीर शिव सुंदर दासने 23 कसोटी आणि चार एकदिवसीय सामन्यांमध्ये भाग घेतला होता. कसोटी सामन्यांमध्ये शिवसुंदर दासने 34.89 च्या सरासरीने 1326 धावा केल्या ज्यात दोन शतके आणि नऊ अर्धशतकांचा समावेश आहे. मात्र, शिवसुंदरला वनडेत 13 च्या सरासरीने केवळ 39 धावा करता आल्या. शिव सुंदर दास हे भारतीय महिला संघाचे फलंदाजी प्रशिक्षक आहेत.
सुब्रतो बॅनर्जी
पाटणा येथे जन्मलेल्या सुब्रतो बॅनर्जी यांनी 1991 मध्ये भारतीय संघाला तयार केले आणि पुढच्या वर्षी ऑस्ट्रेलियाविरुद्ध पदार्पण करण्यात यश मिळवले. सुब्रतो यांनी भारतासाठी एक कसोटी आणि सहा एकदिवसीय सामने खेळले. मध्यमगती गोलंदाज सुब्रतो बॅनर्जीने कसोटीत तीन आणि एकदिवसीय सामन्यात पाच बळी घेतले.
सलील अंकोला
सचिन तेंडुलकर आणि सलील अंकोला यांनी 1989 मध्ये पाकिस्तानविरुद्धच्या कसोटी सामन्यातून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले. सचिन 200 कसोटी सामने खेळला, पण सलील अंकोला फक्त एकच कसोटी आणि 20 एकदिवसीय सामने खेळू शकला. उजव्या हाताचा वेगवान गोलंदाज सलीलने कसोटीत दोन आणि एकदिवसीय सामन्यात 13 बळी घेतले. मुंबई संघाचा निवडकर्ता असलेल्या सलीलने 59 प्रथम श्रेणी सामन्यात 135 बळी घेतले आणि 49 लिस्ट ए सामन्यात 54 बळी घेतले.
श्रीधरन शरथ
श्रीधरन शरथने भारतासाठी एकही सामना खेळला नाही. शरथने तामिळनाडूसाठी देशांतर्गत क्रिकेटमध्ये खूप धावा केल्या होत्या. शरथने 139 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 51.17 च्या सरासरीने 8700 धावा केल्या ज्यात 27 शतके आणि 42 अर्धशतकांचा समावेश आहे. आणि लिस्ट-ए मध्ये शरथने 44.28 च्या सरासरीने 3366 धावा केल्या आहेत. लिस्ट-ए मध्ये शरथने चार शतके आणि 20 अर्धशतके झळकावली.