मुंबई - पुरुष भारतीय संघाचा सलामीवीर शिखर धवन आणि महिला क्रिकेटर स्मृती मनधनाच्या नावाची अर्जुन पुरस्कारासाठी बीसीसीआयने शिफारस केली आहे. याबाबतची माहिती बीसीसीआयचे कार्यवाहक सचिव अमिताभ चौधरी यांनी दिली आहे. गेल्या वर्षभरात या दोन्ही खेळाडूंची कामगिरी उत्कृष्ट आहे. क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात यांची कामगिरी उल्लेखनीय आहे.
शिखर धवनने गेल्या काही वर्षात आपल्या फलंदाजीच्या जोरावर भारताच्या अनेक विजयांमध्ये मोलाचा वाटा उचलला आहे. तर दुसरीकडे, गेल्या वर्षी इंग्लंडमध्ये झालेल्या आयसीसी विश्वचषक स्पर्धेमध्ये महिला क्रिकेटर स्मृती मनधनाने दमदार कामगिरी केली होती. तसेच यावेळी तिने आयसीसी रँकींगमध्ये चौथ्या स्थानावर झेप घेतली होती.
द्रोणाचार्य पुरस्कारासाठी बीसीसीआयने राहुल द्रविडच्या नावाची शिफारस केली आहे. द्रविडच्या प्रशिक्षकपदाखाली भारताच्या 19 वर्षाखालील संघाने विश्वचषकावर नाव कोरले.
खेल रत्न पुरस्कारसाठी विराट कोहलीची शिफारस
भारतीय संघाला अव्वल स्थानावर पोहोचवणाऱ्या विराट कोहलीच्या शिरपेचात अजून एक मानाचा तुरा खोवला जाण्याची शक्यता आहे. भारतातील सर्वोच्च क्रीडा पुरस्कार असलेल्या राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारासाठी बीसीसीआयने विराट कोहलीच्या नावाची शिफारस केली आहे. त्यामुळे स्पोर्टस् अॅवार्ड कमिटीच्या बैठकीत विराटच्या नावावर मोहोर उमटल्यास त्याला हा सर्वोच्च सन्मान मिळू शकतो.
ध्यानचंद पुरस्कारासाठी सुनील गावसकर यांच्या नावाची शिफारसमेजर ध्यानचंद जीवन गौरव पुरस्कारासाठी भारताचे महान सलामीवीर सुनील गावसकर यांच्या नावाची शिफारस बीसीसीआयने केली आहे. हा पुरस्कार आतापर्यंत 51 खेळाडूंना मिळालेला आहे. मात्र आतापर्यंत एकाही क्रिकेटपटूला या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले नाही. गावसकर यांना याआधी पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.