नवी दिल्ली : एस. श्रीसंतवरील आजीवन बंदी उठविण्याविरोधात बीसीसीआयने केरळ उच्च न्यायालयात आव्हान याचिका दाखल केली. यावर स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमनास इच्छुक असलेल्या श्रीसंतने निराशा दर्शवून, ‘बीसीसीआय म्हणजे परमेश्वर नव्हे’, असे वक्तव्य केले.
३४ वर्षांचा वेगवान गोलंदाज श्रीसंत याच्यावर मॅच फिक्सिंगचा आरोप ठेवून बीसीसीआयने त्याच्यावर आजीवन बंदी घातली होती. केरळ उच्च न्यायालयाने चार दिवसांपूर्वी सबळ पुराव्याअभावी त्याच्यावरील बंदी उठविली. या निर्णयास बीसीसीआयने आव्हान देण्याचे ठरविले आहे. निराश श्रीसंतने स्वत:च्या टिष्ट्वटर पेजवर लिहिले, ‘बीसीसीआयकडे मी भीक मागत नाही. मी स्वत:ची उपजीविका परत मागत आहे. हा माझा अधिकार देखील आहे. तुम्ही परमेश्वरापेक्षा मोठे नाही. मी पुन्हा खेळणार. वारंवार निर्दोष ठरलेल्या व्यक्तीसोबत बीसीसीआय सर्वांत कठोर वागत आहे. तुम्ही असे कसे वागू शकता.’’
बीसीसीआयने २०१३ च्या आयपीएल स्पॉट फिक्सिंगमध्ये कथित सहभागाबद्दल श्रीसंतवर बंदी घातली होती. हायकोर्टाच्या एक सदस्यीय पीठाने सोमवारी एका आदेशाद्वारे श्रीसंतवरील बंदी हटविली होती. श्रीसंतचे पुनरागमन होऊ नये यावर बीसीसीआय ठाम आहे. श्रीसंतने भारताकडून २७ कसोटी, ५३ वन डे आणि १० टी-२० आंतरराष्टÑीय सामने खेळले आहेत. आॅगस्ट २०११ मध्ये त्याने देशाकडून अखेरचा सामना खेळला होता. (वृत्तसंस्था)
Web Title: BCCI is not Lord: S. Sreesanth
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.