मुंबई : भारतीय क्रिकेटमध्ये 'जंटलमन' समजल्या जाणाऱ्या राहुल द्रविडला पुन्हा एकदा बीसीसीआयने चौकशीसाठी बोलावले आहे. द्रविड हा बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि चेन्नई सुपर किंग्स संघाचे मालक एन. श्रीनिवासन यांच्या कंपनीमध्ये मोठ्या पदावर असल्याचे समोर आले आहे.
भारतीय संघाचा माजी कर्णधार राहुल द्रविड सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या क्रिकेट ऑपरेशन समितीचा प्रमुख म्हणून काम पाहत आहे. पण, भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) शिस्तपालन अधिकाऱ्याने हितसंबंध जपण्याचा आरोप लावत 'जंटलमन' द्रविडला नोटीस पाठवली होती. या नोटिशीला उत्तर देण्यासाठी द्रविडला बीसीसीआयच्या शिस्तपालन अधिकाऱ्यासमोर हजर राहण्याचे फर्मान सोडले होते. 12 नोव्हेंबरला द्रविडच्या हितसंबंध जपण्याच्या मुद्यावर निर्णय होण्याची शक्यता आहे.
मध्य प्रदेश क्रिकेट असोसिएशनचे सदस्य संजीव गुप्ता यांच्या तक्रारीनंतर बीसीसीआयचे लोकपाल निवृत्त न्यायाधीश डी.के.जैन यांनी ही नोटीस पाठवली. गुप्ता यांनी केलेल्या तक्रारीनुसार द्रविड हा राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा प्रमुख आहे आणि शिवाय तो इंडिया सिमेंट ग्रुपचा उपाध्यक्ष आहे आणि इंडियन प्रीमिअर लीगमध्ये त्यांचा चेन्नई सुपर किंग्स संघ खेळत आहे. गुप्ता यांनीच सचिन तेंडुलकर, व्हीव्हीएस लक्ष्मण यांच्या क्रिकेट सल्लागार समितीतील सहभागावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. तेंडुलकर आणि लक्ष्मण हे दोघेही अनुक्रमे आयपीएलमधील मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैदराबाद संघाचे मेंटॉर आहेत.
राष्ट्रीय संघात प्रदीर्घ काळ एकत्र प्रतिनिधित्व करणारे सौरव गांगुली आणि राहुल द्रविड अनुक्रमे बीसीसीआय अध्यक्ष आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमी प्रमुख (एनसीए) म्हणून भारतीय क्रिकेटच्या भविष्यातील कार्यक्रमावर चर्चा करण्यासाठी बुधवारी बेंगळुरूमध्ये एकत्र येतील.
द्रविडने जुलैमध्ये एनसीएचे प्रमुखपद सांभाळले. त्याने या संस्थेसाठी भविष्यातील योजना तयार केलेली आहे. ज्यावेळी या दोन माजी कर्णधारांची भेट होईल त्यावेळी द्रविड आपली योजना शेअर करेल. या बैठकीत बीसीसीआयचे सर्व नवनिर्वाचित पदाधिकारी सहभागी होतील. ३० ऑक्टोबला होणाऱ्या बैठकीत एनसीएचे मुख्य कार्यकारी अधिकारी तुफान घोषही सहभागी होतील.
गांगुली आणि द्रविड यापूर्वीही बीसीसीआयच्या तांत्रिक समित्यांचे एकत्र सदस्य राहिलेले आहेत. अशाच एका बैठकीचे अध्यक्षपद गांगुलीने भूषविले होते, तर द्रविड त्यात अंडर-१९ व ‘अ’ संघाचा मुख्य प्रशिक्षक म्हणून सहभागी झाला होता. एनसीए म्हणजे भारतीय क्रिकेटला खेळाडू पुरविणारी संस्था मानली जाते. पण गेल्या काही वर्षांत रिहॅबिलिटेशन क्रेंद ठरले आहे. गांगुली यांनीही अध्यक्षपद स्वीकारल्यानंतर तशी कबुली दिली आहे. गांगुली एनसीएच्या नव्या योजनांची माहिती घेतील, अशी आशा आहे.
बीसीसीआयचे एक पदाधिकारी म्हणाले, ‘गांगुली व द्रविड एनसीएच्या भविष्यातील योजना व त्यासंदर्भात येणाºया मुद्यांवर चर्चा करतील.’नवे अध्यक्ष निलंबनातून बाहेर येणारा पृथ्वी शॉसारख्या खेळाडूंच्या रिहॅबिलिटेशन योजनेव्यतिरिक्त जसप्रीत बुमराह व हार्दिक पांड्या यांच्या स्ट्रेंथ व अनुकूलन कार्यक्रमामध्ये किती उत्साह दाखवितात, याबबात उत्सुकता आहे. व्हीव्हीएस लक्ष्मण व राष्ट्रीय संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांना भारतीय क्रिकेटच्या या दोन दिग्गज खेळाडूंच्या मुलाखतीपासून मोठी आशा आहे.