भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री ( Ravi Shastri) यांचा कार्यकाळ आगामी ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेनंतर संपुष्टात येणार आहे. बीसीसीआयनं त्यांना एका महिन्याची मुदतवाढ ऑफर केली होती, परंतु शास्त्रींनी ती फेटाळून लावली. त्यामुळे बीसीसीआयनं मुख्य प्रशिक्षकासाठी अर्ज मागवले आहेत. अशात राहुल द्रविड ( Rahul Dravid) हा सक्षम पर्याय बीसीसीआयकडे होता, परंतु द्रविडनेही राष्ट्रीय क्रिकेट अकादमीच्या ( NCA) प्रमुखपदी कायम राहण्याचा निर्णय कळवला अन् बीसीसीआयचा प्लान फसला. त्यानंतर बीसीसीआय अनिल कुंबळे ( Anil Kumble) आणि व्ही व्ही एस लक्ष्मण ( VVS Laxman) या सीनियर मंडळीकडे वळली. विराट कोहली ( Virat Kohli) सोबत २०१७साली अनिल कुंबळे यांचा कथित वाद झाला होता आणि माजी फिरकीपटूला पुन्हा आणून विराटची गोची करण्याचा बीसीसीआयचा प्रयत्न आहे. पण, तोही आता फसताना दिसत आहे.
कुंबळे हे २०१६-१७ च्या सत्रात भारतीय संघाचे कोच होते. सचिन तेंडुलकर, लक्ष्मण आणि गांगुली यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने त्यांची शास्त्री यांच्याऐवजी कोचपदी नियुक्ती केली होती. चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलमध्ये पाकिस्तानकडून झालेल्या पराभवानंतर कोहलीसोबतचे कुंबळे यांचे मतभेद चव्हाट्यावर येताच कुंबळे यांनी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर रवी शास्त्री हे टीम इंडियाचे प्रशिक्षक बनले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली टीम इंडियाला आयसीसीच्या स्पर्धा जिंकण्यात अपयश आले असले तरी परदेशात विराट अँड सेनेनं दबदबा गाजवला. ऑस्ट्रेलियात सलग दोनदा कसोटी मालिका जिंकली आणि इंग्लंडमध्येही १४ वर्षांनंतर कसोटी मालिकेत वर्चस्व गाजवले.
शास्त्री यांच्यानंतर कुंबळेंचं नाव आघाडीवर होतं, परंतु बीसीसीआयच्या या निर्णयाला अंतर्गत विरोध होत असल्याचे समोर येत आहे. बोर्डाच्या काही सदस्यांनी कुंबळे यांच्या नावाला नापसंती दर्शवली आहे, असे वृत्त IANSनं दिले आहे.