Join us  

टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी रवी शास्त्रीच राहावे, ही तर बीसीसीआयचीच इच्छा? कारण..

सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकिय समितीने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांसह अन्य पदांसाठी अर्ज मागवले आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2019 3:22 PM

Open in App

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने नियुक्त केलेल्या प्रशासकिय समितीने टीम इंडियाच्या मुख्य प्रशिक्षकासह, फलंदाज, गोलंदाज, क्षेत्ररक्षक प्रशिक्षकांसह अन्य पदांसाठी अर्ज मागवले आहेत. त्यामुळे सध्याचे मुख्य प्रशिक्षक रवी शास्त्री यांचे पद कायम राहणार की त्यांच्या जागी नवीन प्रशिक्षक येणार, याची चर्चा सुरू झाली आहे. परंतु, शास्त्री आणि कर्णधार विराट कोहली यांची जोडी तोडणं भारतीय संघाच्या हिताचे नाही, असं भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) अधिकाऱ्यांना वाटत आहे. 

IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना बीसीसीआयच्या अधिकाऱ्यानं सांगितले की,'' कोहली-शास्त्री जोडी 2020च्या ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेपर्यंत कायम ठेवयला हवी. कोणत्याही पदावर कोणीही कायमस्वरुपी राहू शकत नाही. कोहली आणि शास्त्री हे एकमेकांना चांगले ओळखतात आणि त्यांच्यातील समन्वय हा अत्यंत चांगला आहे. त्यामुळे ही जोडी तोडणं चुकीचं ठरेल.'' 

''नव्या प्रशिक्षकाची शैली आत्मसात करण्यात खेळाडूंना वेळ लागेल. जर आता बदल केल्यास पुढील पाच वर्ष तुम्हाला त्याच बदलानुसार रहावे लागेल. त्यामुळे ट्वेंटी-20 वर्ल्ड कप स्पर्धेच्या तोंडावर असा बदल करणे अयोग्य ठरेल,''असेही बीसीसीआयच्या अधिकाऱ्याने स्पष्ट केले. माजी कर्णधार कपिल देव, अंशुमन गायकवाड आणि शांता रंगस्वामी यांची त्रिसदस्यीय समिती प्रशिक्षकाची निवड करणार आहे. शास्त्री यांच्यासह अन्य प्रशिक्षकांचा कार्यकाळ वर्ल्ड कप स्पर्धेनंतरच संपुष्टात आला होता. पण, वेस्ट इंडिज दौऱ्यापर्यंत त्यांना मुदतवाढ देण्यात आली आहे.

टीम इंडियाचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक का व्हायचंय? जाँटी ऱ्होड्सनं सांगितलं कारणभारतीय क्रिकेट संघाच्या क्षेत्ररक्षक प्रशिक्षकपदासाठी दक्षिण आफ्रिकेच्या जाँटी ऱ्होड्सनं अर्ज दाखल केल्यामुळे सर्वांच्या भूवया उंचावल्या आहेत. ''भारतीय संघाच्या क्षेत्ररक्षणाचा चेहरामोहरा बदलण्याचा निर्धार आहे. या संघाने गेल्या तीन वर्षांत अनेक यशोशिखर पादाक्रांत केली आहेत आणि त्यांच्या या कामगिरीचा मी आदर करतो. पण, विराट सेनेला केवळ झेल कमी सोडणारा संघ अशी ओळख द्यायची नाही, तर कमी संधीतही सर्वोत्तम कामगिरी करणारा संघ अशी ओळख तयार करायची आहे,'' असे जाँटीनं सांगितले.

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडिज दौऱ्याची तयारी करत आहे. 3 ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या या दौऱ्यात तीन ट्वेंटी-20, तीन वन डे आणि 2 कसोटी सामने खेळवण्यात येणार आहे. 

 

टॅग्स :बीसीसीआयरवी शास्त्रीविराट कोहलीभारत विरुद्ध वेस्ट इंडिज