पुणे : ‘कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट’च्या मुद्द्यावरून भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) विरूद्ध सचिन तेंडुलकर आणि इतर दिग्गज खेळाडू यांच्यातील वाद सध्या चांगलाच गाजत आहे. या पार्श्वभूमीवर क्रिकेटच्या हिताचा विचार करता ‘कॉन्फ्लिक्टआॅफ इंटरेस्ट’बाबत बीसीसीआयचे पदाधिकारी आणि खेळाडू यांचे प्रबोधन व्हायला हवे. जेणेकरून सर्व शंका दूर होऊन या नियमाबद्दल त्यांच्यात स्पष्टता येईल, असे मत महाराष्ट्र क्रिकेट संघटनेचे माजी अध्यक्ष आणि बीसीसीआयच्या विधी समितीचे माजी सदस्य अॅड. अभय आपटे यांनी व्यक्त केले.बीसीसीआयच्या लोकपालांनी पाठविलेल्या नोटिशीला सचिनने सडेतोड उत्तर दिल्यानंतर हे प्रकरण तापले. या स्थितीसाठी सचिनने बीसीसीआयला जबाबदार ठरवित तिच्या चुकांवर नेमकेपणाने बोट ठेवले. या वादासंदर्भात अॅड. आपटे यांनी ‘लोकमत’सोबत संवाद साधला. ते म्हणाले, ‘‘२०१६ मध्ये विधी समितीवर असताना मी कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट’ हा नियम प्रभावीपणे अमलात यावा, यासाठी अनेक गोष्टी सुचविल्या होत्या. हा नियम लागू करतानाच खेळाडू आणि संघटना या दोन्ही घटकांचे संरक्षण व्हावे, ही भूमिका बीसीसीआयकडे ठामपणे मांडली होती. मात्र त्यावर काहीच निर्णय झाला नाही.’’अध्यक्ष हे आयपीएल संघ विकत घेऊ शकतात काय, या मुद्द्यावरून बीसीसीआयमध्ये ‘कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट’ अर्थात हितसंबांधाची बाधा या मुद्दयाला तोंड फुटले. लोढा समितीने अनेक नवीन सुधारणा सुचविल्या. त्यात बीसीसीआय आणि राज्य संघटनांमध्ये हितसंबंधांबाबत बाधा निर्माण होऊ नये, यासाठीच्या नियमांचाही समावेश त्यात होता. ९ आॅगस्ट २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयाने त्यासंदर्भात निकालही दिला. त्यानुसार बीसीसीआयने घटना रजिस्टर केली. त्यात कलम ३८ आणि ३९ मध्ये ‘कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट’चा उल्लेख आहे. बीसीसीआय पदाधिकारी तसेच खेळाडूंना याची योग्य माहिती नाही. भविष्यात असे प्रसंग उद्भवू नये, म्हणून यावर बीसीसीआयचे पदाधिकारी आणि खेळाडूंचे प्रबोधन करण्यात यावे, असे मत अॅड. आपटे यांनी मांडले. याप्रकरणी तक्रारकर्त्याने अॅफिडेव्हिट द्यावे. तक्रार खोडसाळपणाची असल्याचे निष्पण्ण झाल्यास त्याला शिक्षा व्हावी, असेही त्यांनी सुचविले.
काय आहे नेमका वाद...२०१५मध्ये सचिन, लक्ष्मण आणि गांगुली यांना बीसीसीआयने विनंती करून सल्लागार समितीवर घेतले. ४ वर्षे लोटली तरी अद्याप बीसीसीआयने समितीतील तिघांची भूमिका स्पष्ट केलेली नाही. समिती अस्तित्वात येण्यापूर्वीपासून म्हणजे २०१३ पासून सचिन मुंबई इंडियन्सचा मेंटॉर आहे. गांगुली, लक्ष्मण हे अनुक्रमे दिल्ली आणि हैदराबादचे सल्लागार आहेत. हे तिघेही दोन भूमिका एकाच वेळी पार पाडत असल्याने ‘कॉन्फ्लिक्ट आॅफ इंटरेस्ट’ निर्माण होत असल्याची तक्रार मध्य प्रदेश क्रिकेट संघटनेचे संजीव गुप्ता यांनी केल्यानंतर बीसीसीआयने ती वैध ठरविली. मात्र, दोन्ही भूमिका वेगळ्या असल्याचे स्पष्टीकरण तिघांनीही दिले.