ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेत ICC भारतीय संघाच्या हिताचाच विचार करत असल्याचा आरोप पाकिस्तानचा माजी अष्टपैलू खेळाडू शाहिद आफ्रिदीने ( Shahid Afridi) केला. त्याला BCCI चे अध्यक्ष रॉजर बिन्नी ( Roger Binny) यांनी सडेतोड उत्तर दिले. भारत हा क्रिकेटची महासत्ता असला तरी ICC प्रत्येकाला समान वागणूक देत असल्याचे बिन्नी यांनी स्पष्ट केले.
बांगलादेशविरुद्धच्या निर्णायक सामन्यात भारताने डकवर्थ लुईस नियमानुसार ५ धावांनी विजय मिळवला. पावसामुळे बांगलादेशसमोर सुधारित लक्ष्य ठेवण्यात आले. पण, पाऊस थांबल्यानंतर खेळपट्टी सुकण्याची वाट न पाहता अम्पायर्सनी लगेच खेळ सुरू केला. एक प्रकारे आयसीसीने टीम इंडियाला उपांत्य फेरीत जाण्यासाठी मदत केली, असा आरोप आफ्रिदीने केला. तो म्हणाला,''मैदान पूर्णपणे सुकलेही नव्हते, परंतु आयसीसीचा कल भारताच्या बाजूने आहे. त्यांना कोणत्याही परिस्थितीत भारताला उपांत्य फेरी गाठून द्यायची आहे. भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्यात जे अम्पायर्स होते, तेच याच सामन्यात होते आणि त्यांना सर्वोत्कृष्ट पंच पुरस्कार मिळेल.''
“पावसाचे प्रमाण पाहता ब्रेकनंतर लगेचच खेळ पुन्हा सुरू झाला. आयसीसी, भारताच्या लढती, त्यामुळे येणारे दडपण, यात अनेक घटक गुंतलेले आहेत, हे अगदी स्पष्ट आहे. पण लिटनची फलंदाजी अप्रतिम होती. तो सकारात्मक क्रिकेट खेळला. सहा षटकांनंतर, आम्हाला वाटले की बांगलादेशने आणखी २-३ षटकात विकेट गमावल्या नाहीत तर त्यांनी सामना जिंकला असता. एकूणच, बांगलादेशने दाखवलेली लढत चमकदार होती,” तो पुढे म्हणाला.
रॉजर बिन्नी काय म्हणाले?
बिन्नी स्पष्ट केले की, आयसीसीबाबत असे विधान कोणीही करू शकत नाही. कारण, टीम इंडियासाठी असे काही विशेष नाही. पुढील फेरीत धडक मारण्याच्या शक्यतेच्या जवळ असलेल्या भारताचे लक्ष्य ६ नोव्हेंबर रोजी झिम्बाब्वेविरुद्धच्या सामन्यात वर्चस्व गाजवण्याचे लक्ष्य असेल. " आफ्रिदीचे बोलणे योग्य नाही. मला वाटत नाही की आम्हाला आयसीसीने पसंती दिली आहे. सर्वांना समान वागणूक मिळते. आम्हाला इतर संघांपेक्षा वेगळे काय मिळते? भारत हे क्रिकेटमधील एक मोठे पॉवरहाऊस आहे, परंतु आयसीसीकडून सर्वांना समान वागणूक दिली जाते,” असे बिन्नी म्हणाले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"