नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-२० विश्वचषकाचा थरार रंगला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (BCCI) नवनिर्वाचित अध्यक्ष रॉजर बिन्नी यांनी अलीकडेच माजी भारतीय कर्णधार विराट कोहलीच्या फलंदाजीचे कौतुक केले होते. किंग कोहलीच्या नाबाद ८२ धावांच्या जोरावर भारताने आयसीसी टी-२० विश्वचषक २०२२ च्या पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा ४ गडी राखून पराभव केला. भारताकडून पराभूत झाल्यानंतर पाकिस्तानला झिम्बाब्वेविरुद्ध १ धावांनी पराभव स्वीकारावा लागला. सलग दोन पराभवानंतर पाकिस्तानसाठी उपांत्य फेरीचा मार्ग कठीण झाला आहे. झिम्बाब्वेच्या पाकिस्तानवर ऐतिहासिक विजयाबद्दल बोलताना बीसीसीआयचे अध्यक्ष रॉजर बिन्नी म्हणाले की, सलग दोन पराभवानंतर शेजारील देशाला अंतिम चारमध्ये स्थान मिळवणे कठीण होईल.
शेजाऱ्यांचे नशीब भारताच्या हाती
भारताने पहिल्या सामन्यात पाकिस्तानचा तर दुसऱ्या सामन्यात नेदरलॅंड्सचा पराभव केला. पाकिस्तानला भारत आणि झिम्बाब्वे यांच्याकडून पराभव स्वीकारावा लागला. त्यामुळे पाकिस्तानला आज होणारा नेदरलॅंड्सविरूद्धचा सामना 'करा किंवा मरा' असा असणार आहे. पाकिस्तानी चाहते भारताच्या विजयासाठी देखील प्रार्थना करतील कारण भारताचा विजय पाकिस्तानला विश्वचषकात जिवंत ठेवू शकतो. पाकिस्तानचे पुढील सामने नेदरलॅंड्स, दक्षिण आफ्रिका आणि बांगलादेश यांच्याविरूद्ध होणार आहेत. जर त्यांनी हे तिन्ही सामने जिंकले तर त्यांचे एकूण ६ गुण होतील. त्यामुळे त्यांना उपांत्य फेरीत पोहोचण्यासाठी दक्षिण आफ्रिकेच्या पराभवासाठी प्रार्थना करावी लागेल. कारण आफ्रिकेचे सध्या ३ गुण आहेत. आफ्रिकेला उर्वरित सामन्यांत पाकिस्तानसह नेदरलँड्स, भारत व बांगलादेश यांच्याशी भिडावे लागेल. अशात भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना पाकिस्तानसाठी निर्णायक ठरणार आहे.
BCCI अध्यक्षांनी केली भविष्यवाणी
एएनआय या वृत्तसंस्थेशी संवाद साधताना रॉजर बिन्नी यांनी म्हटले, "लहान संघ पुढे येत आहेत हे चांगले आहे. या टी-२० विश्वचषकात झिम्बाब्वे आणि आयर्लंडने हे सिद्ध केले आहे. कोणताही संघ यापुढे लहान संघांना हलक्यात घेऊ शकत नाही. कारण ते तुम्हाला सहज हरवू शकतात. मला वाटते की पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठणे कठीण जाईल. तसे झाले तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट असेल, पण क्रिकेट हा एक मजेदार खेळ आहे. तुम्हाला माहीत नाही, त्यात कधीही काहीही होऊ शकते."
बाबर आझमच्या नेतृत्वाखालील पाकिस्तान संघाला रविवारी म्हणजेच आज नेदरलँड्सविरुद्ध तिसरा सामना खेळायचा आहे. २००९ चा चॅम्पियन पाकिस्तान सुपर-१२ च्या ग्रुप २ च्या गुणतालिकेत नेदरलॅंड्सपेक्षा वर आहे. दोन्हीही संघाचे अद्याप विजयाचे खाते उघडले नाही. तर भारतीय संघाने सलग दोन सामने जिंकून ग्रुप बीच्या क्रमवारीत अव्वल स्थान गाठले आहे. भारताचा आज तिसरा सामना दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"
Web Title: BCCI president Roger Binny has predicted whether Pakistan will reach the semi-finals of the T20 World Cup 2022
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.