भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( बीसीसीआय) सचिवपदी जय शाह यांची झालेली निवड ही सर्वांच्या चर्चेची विषय ठरली होती. जय शाह हे केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांचे जिरंजीव आहे आणि त्यामुळेच जय यांची वर्णी बीसीसीआयमध्ये लागली अशी टीका होत आहे. पण, बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुलीनं शनिवारी जय यांच्यासाठी दमदार फलंदाजी केली. प्रसिद्ध व्यक्ती क्रिकेटच्या प्रशासकीय व्यवस्थेत सहभाग घेत असतील तर त्यानं काहीच नुकसान होणार नाही आणि आडनावा पलीकडे विचार करण्याची मानसिकता तयार व्हायला हवी, असंही गांगुलीनं स्पष्ट केलं.
India Today Conclave 2019मध्ये गांगुलीनं जय शाह यांच्यावर होणाऱ्या टीकेवर उत्तर दिले. तो म्हणाला,''तुम्ही एखाद्या मोठ्या व्यक्तीची मुलगा किंवा मुलगी आहात, तर तुम्ही अशा संघटनेत सहभाग घेऊ शकत नाही. भारतात असे अनेकदा घडले आहे. सचिन तेंडुलकरच्या मुलाबद्दलही असंच होत आहे. सचिनने अनेकदा सांगितले आहे की, त्याच्या मुलाकडे क्रिकेटपटू म्हणून पाहा, माझा मुलगा म्हणून नको. त्याचं आडनाव पाहू नका, तर तो खेळतो कसा ते पाहा.''
यावेळी गांगुलीनं परदेशातील काही उदाहरणं दिली. ''अर्जुन हा सचिन तेंडुलकरचा मुलगा आहे, म्हणून त्यानं क्रिकेट का खेळू नये? ऑस्ट्रेलिया, इंग्लंडमध्ये असे होत नाही. मार्क वॉ, स्टीव्ह वॉ ही दोघं भाऊ ऑस्ट्रेलियासाठी शंभरहून अधिक कसोटी सामने खेळले. टॉम कुरन आणि सॅम कुरन इंग्लंडकडून खेळत आहेत. प्रत्येकाची निवड ही त्यांच्या वैयक्तिक कामगिरीवर झालेली आहे.''
''नशीब मला मुलगा नाही. उद्या जर राहुल द्रविडच्या मुलाला क्रिकेट खेळण्याची इच्छा झाली, तर त्यांना रोखणार का? कर्नाटकमधील शालेय लीगमध्ये ते सातत्यानं शतकी खेळी करत आहेत आणि जर त्यांची कामगिरी बोलकी असेल तर ते भविष्यात भारताकडूनही खेळतील. हेच मला जय शाह यांच्याबद्दल सांगायचे आहे. ते अमित शाह यांचे चिरंजीव आहेत, तर मग काय? त्यांनी निवडणुक जिंकली आहे. गेली 6-7 वर्षे ते गुजरात क्रिकेट असोसिएशनमध्ये कार्यरत आहेत. त्यामुळे बीसीसीआयमध्ये ते त्यांच्या स्वकर्तृत्वावर आले आहेत. त्यांचे वडिल राजकारणी आहेत, ते नाही.''