नवी दिल्ली ।
भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार विराट कोहली सध्या खराब फॉर्मचा सामना करत आहे. मागील तीन वर्षांपासून किंग कोहलीला एकही शतकीय खेळी करता आली नाही. सध्या भारतीय संघ इंग्लंड दौऱ्यावर आहे, त्यामध्ये देखील कोहलीला साजेशी खेळी करण्यात अपयश आले. सध्या फॉर्ममध्ये नसलेल्या कोहलीला टीकाकारांचा प्रचंड सामना करावा लागत आहे. काही माजी दिग्गज खेळाडूंनी त्याला विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे तर काहींनी त्याने देशांतर्गत क्रिकेट खेळण्याचे म्हटलं आहे. यादरम्यान बीसीसीआयचे अध्यक्ष आणि क्रिकेटचे दादा सौरव गांगुली यांनी किंग कोहलीच्या बचावात एक वक्तव्य केलं आहे.
सौरव गांगुली यांनी म्हटले की, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील विराटचे आकडे पाहा, हे सहज मिळवता येत नाहीत. कोहली सध्या कठीण काळातून जात आहे आणि याची कल्पना त्याला देखील आहे. तसेच कोहली हा एक महान खेळाडू असल्याचे गांगुलींनी सांगितले. त्याला त्याची जागा माहिती असून मला खात्री आहे की तो लवकरच त्याच्या फॉर्ममध्ये परतेल आणि चांगली फलंदाजी करेल असे गांगुलींनी अधिक म्हटले.
सौरव गांगुलींनी केली किंग कोहलीची पाठराखण
"कोहलीला चांगला रस्ता निवडावा लागेल आणि यश मिळवावे लागेल, जे तो मागील १२ ते १३ वर्षांपासून करत आला आहे. मला विश्वास आहे की कोहली या लयनुसार लवकरच खेळेल." असे बीसीसीआय अध्यक्ष सौरव गागुंली यांनी वृत्तवाहिनी एएनआयशी संवाद सांधताना म्हटले.
कोहलीवर दिग्गजांनी साधला निशाणा
भारतीय संघातील विराट कोहलीच्या जागेबद्दल अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. माजी क्रिकेटपटू कपिल देव आणि व्यंकटेश प्रसाद यांनी देखील कोहलीच्या फॉर्मवर चिंता व्यक्त केली होती. मात्र गांगुलींनी म्हटले की, खेळात हे सर्व होत असते. सर्वांसोबतच असं झालं असून सचिन तेंडुलकरला देखील याचा सामना करावा लागला होता. आता विराट कोहली सोबत होत आहे त्यामुळे याकडे फार लक्ष देत नसल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, या अगोदर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा तसेच ऑस्ट्रेलियाचा फलंदाज उस्मान ख्वाजा यांनी कोहलीची पाठराखण केली होती. उस्मान ख्वाजाने तर कपिल देव यांची खिल्ली उडवत कोहलीसारखा खेळाडू विश्वचषक खेळणार नसेल तर ऑस्ट्रेलियाचा संघ त्याला सहमत असल्याचे म्हटले होते. यावर्षांच्या शेवटी होणाऱ्या टी-२० विश्वचषकापूर्वी विराट कोहलीला त्याच्या फॉर्ममध्ये परतावे लागेल, नाहीतर संघातून त्याचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे. आगामी टी-२० विश्वचषकाचे आयोजन ऑस्ट्रेलियामध्ये होणार आहे.
Web Title: BCCI President Sourav Ganguly give statement for saves Virat Kohli
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.