भारतीय क्रिकेट इतिहासात महेंद्रसिंग धोनीचा ( MS Dhoni) काळ हा सुवर्ण अक्षराने लिहिला गेला आहे... राष्ट्रीय संघाचे नेतृत्व करताना धोनीनं भारताला अनेक अविस्मरणीय क्षण दिले आहेत. 2007 ट्वेंटी-20 वर्ल्ड कप, 2011 चा वन डे वर्ल्ड कप आणि 2013 ची चॅम्पियन्स ट्रॉफी अशा आयसीसीच्या तीनही ट्रॉफी जिंकणारा तो जगातील एकमेव कर्णधार आहे. आता रिषभ पंत ( Rishabh Pant) कडे धोनीचा वारसदार म्हणून पाहिले जात आहे. धोनी युगानंतर निर्माण झालेली पोकळी रिषभ भरून काढेल असा दावा करण्यात येतोय. रिषभनेही काही अफलातून खेळीतून त्याची झलक दाखवली. पण, BCCI अध्यक्ष आणि भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याचे मत काही वेगळे आहे.
आयपीएल 2022 क्वालिफायर 1 च्या राजस्थान रॉयल्स विरुद्ध गुजरात टायटन्स या लढतीपूर्वी गांगुलीने याबाबत त्याचं मत व्यक्त केले. तो म्हणाला,''महेंद्रसिंग धोनीसोबतरिषभ पंतची तुलना करू नका. धोनीकडे अऩुभवाची खाण आहे, आयपीएल, कसोटी व वन डे अशा 500 हून अधिक सामन्यांत त्याने नेतृत्व केले आहे. त्यामुळे धोनीसोबत रिषभची तुलना योग्य ठरणारी नाही.''
आयपीएल 2022 मेगा ऑक्शनमध्ये दिल्ली कपिटिल्सने रिषभला रिटेन केले. त्याने या पर्वात 14 सामन्यांत 340 धावा केल्या आणि दिल्लीकडून डेव्हिड वॉर्नरनंतर सर्वाधिक धावा करणारा तो दुसरा फलंदाज ठररला. दिल्लीला प्ले ऑफमध्ये प्रवेश मिळवण्यात अपयश आले. मुंबई इंडियन्सने अखेरच्या साखळी सामन्यात त्यांना पराभूत केले.
कर्णधार म्हणून रिषभ पंत योग्य पर्याय: रिकी पाँटिंग‘रिषभ पंत अजूनही खूप युवा आहे. तो कर्णधारपदाचे डावपेच चांगल्याप्रकारे शिकत आहे. त्यामुळे दिल्ली कॅपिटल्सचा कर्णधार म्हणून अजूनही तोच योग्य पर्याय आहे,’ असे दिल्लीचा मुख्य प्रशिक्षक रिकी पाँटिंगने म्हटले. पाँटिंग म्हणाला की, ‘निश्चितपणे मला कोणतीही शंका नाही की, दिल्लीचा कर्णधार म्हणून पंतच योग्य आहे. गेल्या सत्रातही मला त्याच्या क्षमतेवर शंका नव्हती. पंतने श्रेयस अय्यर दुखापतग्रस्त झाल्यानंतर संघाचे कर्णधारपद सांभाळले आणि तेव्हापासून त्याने शानदार कामगिरी केली आहे.’