भारत आणि दक्षिण अफ्रिका, इंग्लंड आणि श्रीलंका यांमध्ये होणारी मालिका करोना व्हायरसमुळे रद्द करण्यात आल्या आहेत. तसेच भारतातील लोकप्रिय लीग म्हणून प्रसिद्ध असणारी 'आयपीएल'ची स्पर्धा देखील पुढे ढकलण्याता निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. मात्र कोरोनाचा प्रदुर्भाव कमी न झाल्यास यंदाची आयपीएल स्पर्धा रद्द केली जाईल असं सांगण्यात येत आहे.
एका वृत्तस्स्थेने दिलेल्या वृत्तानूसार, आयपीएलचा 13व्या हंगामाची सुरुवात 15 एप्रिलपर्यत न झाल्यास आयपीएलची स्पर्धा रद्द केली जाऊ शकते अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. मे महिन्यानंतर आगमी आशियाई विश्वचषक आणि ट्वेंटी -20 विश्वचषकाची तयारी सर्व संघांना करावी लागणार आहे. त्यामुळे बीसीसीआय आयपीएलची स्पर्धा रद्द करण्याचा निर्णय घेऊ शकते असं सांगण्यात येत आहे.
बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आयपीएलचे आयोजन पुढे ढकलण्याबाबत म्हणाले की, सध्या स्पर्धा पुढे ढकलण्याचा एकमेव पर्याय योग्य होता. तसेच खेळाडूंनी सुरक्षित राहणं हे सर्वात महत्वाचे असल्याचे सांगितले. तसेच आगामी काही दिवसात काय घडामोडी घडतील यावरुन आयपीएलचे भवितव्य ठरणार आहे असं सौरव गांगुली यांनी सांगितले.
कोरोना व्हायरसमुळे आयपीएलचे आयोजन पुढे ढकलण्याचा निर्णय बीसीसीआयने घेतला आहे. आयपीएल 2020ची स्पर्धा 29 मार्चपासून सुरुवात होणार होती. मात्र कोरोनामुळे दिल्ली सरकारने दिल्लीत एकही आयपीएलचे सामने न खेळवण्याचे जाहीर केले. यानंतर बीसीसीआयने आयपीएलचे सामने 29 मार्च ऐवजी 15 एप्रिलपासून खेळवणार असल्याचे जाहीर केले आहे. कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी आम्ही आयपीएलचे आयोजन पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला असल्याचे बीसीसीआयने स्पष्ट केले आहे.
दरम्यान, भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांच्यातल्या पहिल्या वन डे सामन्यात पावसाने जोरदार हजेरी लावल्याने एकही चेंडू न खेळवता सामना रद्द करण्यात आला होता. या मालिकेतील दूसरा सामना 15 मार्चला लखनऊ आणि तिसरा वन डे सामना 18 मार्चला कोलकाता येथे रंगणार होता. तसेच हे दोन्ही सामने प्रेक्षकांविना खेळवण्याचा निर्णयही बीसीसीआयने घेतला होता. मात्र कोरोना व्हायरसचा प्रदूर्भाव पाहता आज मालिकेतील दोन्ही सामने रद्द करण्याचा निर्णय बीसीसीआयने जाहीर केला आहे.