नवी दिल्ली : आयसीसीचे (ICC) नवे अध्यक्ष कोण होणार याची चर्चा रंगली असतानाचा सौरव गांगुलींनी (Sourav Ganguly) मोठे वक्तव्य केले आहे. बीसीसीआयचे (BCCI) अध्यक्ष सौरव गांगुली यांनी गुरुवारी आयसीसीचे अध्यक्षपद आपल्या हातात नसल्याचे सांगितले आहे. जुलै महिन्यात आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या पुढील अध्यक्षांच्या निवडीला मान्यता दिली होती. बर्मिंगहॅममधील बैठकीनंतर ग्रेग बार्कले यांचा कार्यकाळ या वर्षी संपल्यानंतर साध्या बहुमताने निवडणुका होणाप आहे. तर पुढील अध्यक्षांचा कार्यकाळ 1 डिसेंबर 2022 ते 30 नोव्हेंबर 2024 या कालावधीपर्यंत असणार आहे.
दादांच्या विधानानं उंचावल्या भुवया खरं तर निवडणुकीची घोषणा झाल्यापासून अध्यक्षपदासाठी गागुंलींच्या नावाची चर्चा सुरू झाली आहे. याबाबत त्यांना विचारले असता ते म्हणाले, आयसीसी अध्यक्षपद माझ्या हातात नाही. नव्या सूचनेनुसार उमेदवाराला अध्यक्ष होण्यासाठी 51 टक्के मतांची आवश्यकता आहे. मात्र आयसीसीचे अध्यक्षपद आपल्या हातात नसल्याचे सांगून गांगुलींनी सस्पेंस कायम ठेवला आहे.
भारतीय संघाने मागील काही कालावधीपासून खराब कामगिरी केली असल्याचे गांगुली यांनी मान्य केले. संघ मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करत नाही हा चिंतेचा विषय असल्याचे त्यांनी म्हटले. "रोहित शर्माच्या नेतृत्वातील विजयाची टक्केवारी जवळपास 80 आहे. भारताने मागील तीन ते चार सामने गमावले आहेत परंतु त्यापूर्वी 35- 40 पैकी फक्त पाच किंवा सहा सामने गमावले आहेत", असे त्यांनी म्हटले.
तसेच "मला खात्री आहे की रोहित आणि राहुल द्रविडला जाणीव असेल की आपण मोठ्या टूर्नामेंटमध्ये चांगली कामगिरी करू शकलो नाही. मात्र एक चांगली गोष्ट अशी आहे की विराट शानदार खेळला आहे. आशिया चषक स्पर्धेत त्याची कामगिरी चांगली होती आणि मला आशा आहे की तो याच लयनुसार खेळत राहील", असे गांगुली यांनी अधिक म्हटले.
झुलन गोस्वामीचे केले कौतुक महिला वेगवान गोलंदाज झुलन गोस्वामी इंग्लंडविरुद्धच्या तिसऱ्या आणि अंतिम एकदिवसीय सामन्यानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा करणार आहे. झुलन ही एक लीजेंड आहे. बीसीसीआय अध्यक्ष म्हणून गेल्या तीन वर्षांत आमचे चांगले संबंध आहेत. तिची कारकिर्द अप्रतिम होती आणि ती यापुढेही महिला क्रिकेटमध्ये एक आदर्श राहील. अशा शब्दांत बीसीसीआय अध्यक्षांनी झुलन गोस्वामीचे कौतुक केले.