कोलकाता : माजी कर्णधार तसेच बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुली यांना शनिवारी सकाळी हृदयविकाराचा सौम्य झटका आल्यानंतर एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून सध्या त्यांची प्रकृती ठीक आहे. त्यामुळे येत्या दोन ते तीन दिवसांत सौरव गांगुली यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येणार असल्याचे समजते. दरम्यान, सौरव गांगुली यांच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी, यासाठी सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यासह क्रिकेट आणि राजकारणातील अनेक दिग्गजांनी प्रार्थना केली आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी सौरवच्या प्रकृतीत लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थनाही केली आहे. तसेच सौरव गांगुलींच्या उपचारांसाठी लागणाऱ्या सर्व मदतीची तयारीही अमित शाह यांनी दर्शवली आहे. अमित शाह यांनी सौरव गांगुली यांची पत्नी डोना गांगुली यांना फोन करुन सौरव गांगुली यांच्या प्रकृतीची माहितीही घेतली आहे. तर बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी गांगुली यांच्या स्वास्थ्यासाठी पार्थना केली आहे. "गांगुली यांना सौम्य झटका आला, हे ऐकून मला फार दुख झालं. गांगुली लवकरात लवकर बरा व्हावा, अशी मी प्रार्थना करते. आम्ही गांगुली यांच्या कुटुंबासोबत आहोत," असे ट्विट ममता बॅनर्जी यांनी केले आहे.
दुसरीकडे, कोहलीने ट्विट केले, ‘तुम्ही लवकर बरे होण्याची प्रार्थना करतो. लवकर बरे व्हा.!’ सचिन म्हणाला, ‘आताच सौरव यांच्या आजाराची माहिती कळाली. ते लवकर बरे होतील अशी आशा आहे.’ बीसीसीआय सचिव जय शाह म्हणाले, ‘गांगुली उपचाराला झपाट्याने प्रतिसाद देत आहेत. मी त्यांच्या लवकर बरे होण्यासाठी प्रार्थना करतो. मी त्यांच्या कुटुंबीयांसोबतही संवाद साधला.’ आयसीसीनेदेखील गांगुली यांच्या प्रकृती स्वास्थ्याबाबत चिंता व्यक्त करीत लवकर बरे होण्याची प्रार्थना केली आहे. वीरेंद्र सेहवाग, हरभजन सिंग, अनिल कुंबळे आणि गौतम गंभीर या माजी सहकाऱ्यांनी गांगुली लवकर बरे होतील, अशी आशा व्यक्त केली.
दरम्यान, यंदा एप्रिल-मे मध्ये बंगाल विधानसभेची निवडणूक प्रस्तावित आहे. सौरव गांगुली राजकारणात येणार अशी चर्चा असताना त्यांच्यावर हा आघात झाला. सौरव गांगुली भारतीय जनता पक्षाकडून मुख्यमंत्रिपदाचा चेहरा असतील, असाही तर्क लावला जात आहे. गांगुलींनी मात्र राजकारणात प्रवेशाचे अद्याप संकेत दिलेले नाहीत. काही दिवसांआधी त्यांनी बंगालच्या राज्यपालांची भेट घेतली होती. ही सदिच्छा भेट होती, असे नंतर खुद्द सौरव गांगुली यांनीच स्पष्ट केले होते. ऑक्टोबर २०१९ला मुंबईत झालेल्या बीसीसीआयच्या आमसभेत गांगुलींची अध्यक्षपदी निवड झाली होती. ते बीसीसीआयचे ३९ वे अध्यक्ष आहेत.