मुंबई: भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्डाचे अध्यक्ष सौरव गांगुली यांची आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. नियामक मंडळानं आज याबद्दलच्या माहितीला दुजोरा दिला. गांगुली आता त्याचा माजी संघ सहकारी अनिल कुंबळे यांची जागा घेईल. कुंबळे यांची नियुक्ती २०१२ मध्ये झाली. आयसीसीच्या क्रिकेट समितीच्या अध्यक्षपदी सौरव गांगुली यांचं स्वागत करताना मला आनंद वाटतो, असं आयसीसीचे अध्यक्ष ग्रेग बार्कले यांनी म्हटलं.
जगातील सर्वश्रेष्ठ खेळाडूंपैकी एक असलेल्या आणि आता एका प्रशासकाच्या भूमिकेत असलेल्या सौरव गांगुली यांचा अनुभव आम्हाला पुढे जाण्यात उपयुक्त ठरेल, अशी आशा बार्कले यांनी व्यक्त केली. गेल्या नऊ वर्षांत अनिल कुंबळे यांनी समितीचं उत्कृष्टपणे नेतृत्त्व केलं. डीआरएससारख्या निर्णयांमुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सुधारणा झाल्या. संशयास्पद गोलंदाजीच्या ऍक्शनवर पायबंद घालण्यासाठी त्यांनी एक सक्षम प्रक्रिया आणली. त्यासाठी आम्ही अनिल यांचे आभारी आहोत, अशा शब्दांत बार्कले यांनी कुंबळे यांना धन्यवाद दिले.
आयसीसी बोर्डानं मंगळवारी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. अफगाणिस्तानात तालिबानचं सरकार आल्यानं तिथल्या क्रिकेटच्या स्थितीची समीक्षा करण्यासाठी कार्यकारी समितीची स्थापना करण्याचा निर्णय बैठकीत घेतला गेला. तालिबान सत्तेत आल्यापासून तिथल्या क्रीडा संघांचं भविष्य काय असेल याबद्दल चिंता व्यक्त होत आहे. ऑस्ट्रेलियाचा संघ एक कसोटी सामना खेळण्यासाठी अफगाणिस्तानला जाणार होता. मात्र क्रिकेट ऑस्ट्रेलियानं संघाचा दौरा स्थगित केला.