कोलकाता - बीसीसीआय अध्यक्ष सौरव गांगुलीची दुसऱ्यांदा अॅन्जिओप्लास्टी करण्यात आली असून त्याच्या हृदयाच्या धमन्यांमध्ये दोन स्टेंट लावण्यात आल्या आहेत. काही दिवसांपूर्वीच त्याची एक अॅन्जिओप्लास्टी झाली होती. मात्र, बुधवारी त्याच्या छातीत दुखू लागल्याने त्याला अपोलो रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, गांगुलीची दुसऱ्या राउंडची अॅन्जिओप्लास्टी यसस्वी झाली आहे.
गेल्या 2 जानेवारीला जिम मारत असताना छातीत दुखू लागल्याने सोरव गांगुलीला वुडलँड्स रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यावेळी तो पोच दिवस रुग्णालयात होता. यानंतर त्याला सात जानेवारीला रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली होती.सौरव गांगुलीच्या जवळ्या व्यक्तीने एएनआयसोबत बोलताना सांगितले, की 'गांगुलीची अॅन्जिओप्लास्टी यशस्वीपणे पार पडली आहे. दोन स्टेंट लावण्यात आल्या आहेत'. सौरव गांगुलीला अपोलो रुग्णालयात दाखल केल्यानंतर त्याच्या वैद्यकीय चाचण्या करण्यात आल्या. यानंतर त्याची दुसऱ्यांदा अॅन्जिओप्लास्टी करण्याचा निर्णय घेण्यात आला. यासंदर्भात डॉक्टर म्हणाले होते, 'गांगुलीला काल रात्री चांगली झोप आली. त्याने सकाळी हलका नाश्ताही केला. आज त्याच्या अनेक चाचण्या होणार आहेत. यानंतर पुढील निर्णय घेण्यात येईल.'
आक्रमक कर्णधारभारतीय संघाचा आक्रमक कर्णधार म्हणून गांगुलीची ओळख आहे. आरे ला कारेनं उत्तर देण्याच्या त्याच्या शैलीनं टीम इंडियातील प्रत्येक खेळाडूला प्रतिस्पर्ध्यांना भिडण्याची ताकद दिली. २००३ मध्ये त्याच्याच नेतृत्वाखाली टीम इंडियानं १९८३ नंतर प्रथमच वर्ल्ड कप स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. इंग्लंडला त्यांच्याच घरच्या मैदानावर नेटवेस्ट सीरिजमध्ये नमवल्यानंतर लॉर्ड गॅलरीत गांगुलीनं जर्सी काढून केलेलं सेलिब्रेशन आजही सर्वांच्या लक्षात आहे.
BCCIचा अध्यक्ष झाल्यानंतरही त्यानं अनेक चांगले उपक्रम राबवले. त्याच्या नेतृत्वाखाली कोरोना संकटातही इंडियन प्रीमिअर लीग यूएईत यशस्वीरित्या पार पडली. गांगुलीनं ११३ कसोटीत ४२.१७च्या सरासरीनं ७२१२ धावा केल्या आहेत. त्यात १६ शतकं व ३५ अर्धशतकं आहेत. ३११ वन डे सामन्यांत ११३६३ धावा त्यांनी चोपल्या. त्यात २२ शतकं व ७२ अर्धशतकांचा समावेश आहे.