भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI चा अध्यक्ष सौरव गांगुली ( Sourav Ganguly) याच्याभवती सध्या वादानं वर्तुळ केलेलं पाहायला मिळत आहे. माजी कर्णधार विराट कोहलीसोबतच्या एपिसोडनंतर सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका फोटोने नवा वाद निर्माण केला. सौरव गांगुली हा टीम इंडियाच्या निवड प्रक्रियेत लुडबुड करत असल्याचा आरोप केले गेले. सोशल मीडियावर गांगुलीविरोधात नेटिझन्सनी मोहीम चालवली. त्यात बीसीसीआयच्या काही अधिकाऱ्यांनी या वृत्ताला दुजोरा देणारे वक्तव्य केले. व्हायरल झालेल्या फोटोत गांगुली माजी निवड समिती प्रमुख एमएसके प्रसाद, विराट कोहली, रोहित शर्मा आणि अन्य अधिकाऱ्यांसोबत मिटिंगमध्ये बसलेला दिसत आहे. त्यावरून ही चर्चा सुरू झाली.
अखेर त्यावर गांगुलीने मौन सोडले. बीसीसीआयचा अध्यक्ष म्हणून माझी भूमिका काय, याची मला जाण आहे आणि हे सर्व आरोप निरर्थक आहेत, असे मत गांगुलीने व्यक्त केले. ''मी कोणाता उत्तर देण्यास बांधिल आहे असे मला वाटत नाही आणि या निराधार आरोपांचे मी खंडन करतो. मी बीसीसीआयचा अध्यक्ष आहे आणि अध्यक्ष म्हणून जे काम करायला हवं, ते मी करतो. त्या फोटोबाबत सांगायचे तर मी निवड समितीच्या बैठकीत दिसत असल्याचा दावा केला जात आहे. तर तो फोटो निवड समितीच्या बैठकीतला नाही. जयेश जॉर्ज हे निवड समितीच्या बैठकीचे सदस्य नाही. मी देशासाठी ४२४ आंतरराष्ट्रीय सामने खेळलो आहे. काही लोकांना याची आठवण करुन देणे ही कल्पना वाईट नाही.''
BCCI ने २०१९मध्ये त्यांच्या ट्विटर हँडलवर हा फोटो पोस्ट केला होता आणि बांगलादेशविरुद्धच्या मालिकेसाठीच्या संघ निवडीसाठीच्या बैठकीतील असल्याचे त्यावर लिहिले होते.
भारताचा पुढील कसोटी कर्णधार कोण?दक्षिण आफ्रिकेतील कसोटी मालिकेनंतर विराट कोहलीनं नेतृत्व सोडले आणि त्यानंतर आता भारताचा कसोटी कर्णधार कोण असेल, याची उत्सुकता रागली आहे. रोहित शर्मा हा भारताच्या ट्वेंटी-२० व वन डे संघाचा कर्णधार आहे. त्याच्याकडेच ही जबाबदारी सोपवली जाईल का, असा प्रश्न अनेकांना आहे. भारतीय संघ मार्च महिन्यात घरच्या मैदानवार श्रीलंकेविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका खेळणार आहे.
गांगुली म्हणाला, कसोटी संघाच्या कर्णधारासाठी काही मापदंड आहेत. निवड समितीच्या डोक्यात या पदासाठी नाव आहे आणि त्यासंदर्भात ते बीसीसीआयशी चर्चा करतील. लवकरच याबाबतची घोषणा होईल.