T20 World Cup 2022 : ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारतीय संघाच्या तयारीचा रिआलिटी चेक सुरू आहे. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाला आशिया चषक २०२२ मध्ये जेतेपद कायम राखण्यात अपयश आले. भारत-पाकिस्तान फायनल होईल असे वाटले होते, परंतु श्रीलंकेने आश्चर्याचा धक्का देत रोहितसेनेला बाहेर केले. त्यानंतर ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-२०त भारताला ४ विकेट्सने हार मानावी लागली. २०८ धावांचा बचाव करण्यात भारतीय गोलंदाज अपयशी ठरले. आता भारताच्या हातात चूका सुधारण्यासाठी पाच ट्वेंटी-२० सामने आहेत आणि त्यात टीम इंडियाने दमदार कामगिरी करावी, अशी अनेकांची इच्छा आहे.
भारताचा माजी कर्णधार आणि BCCI अध्यक्ष सौरव गांगुली याने मोठ्या स्पर्धांमध्ये भारतीय संघाला येत असलेल्या अपयशाबाबत चिंता व्यक्त केली. पण, त्याने रोहित शर्माला पूर्ण पाठिंबा दिलाय... मागच्या वर्षी विराट कोहलीने कर्णधारपदाची जबाबदारी सोडल्यानंतर रोहितने मोर्चा हाती घेतली. द्विदेशीय मालिकांमध्ये रोहितच्या नेतृत्वाखाली भारताने यश मिळवले, परंतु आशिया चषक स्पर्धेत अपयशी ठरले. गांगुलीने रोहितचे नेतृत्व व मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यावर विश्वास दाखवला आहे.
तीन वर्षांनंतर आयपीएलच्या फॉरमॅटमध्ये होतोय बदल; BCCI अध्यक्ष सौरव गांगुलीची घोषणा
''रोहित शर्माची विजयाची टक्केवारी ही जवळपास ८० टक्के इतकी आहे. भारताने ३-४ सामने गमावले आहेत, परंतु त्याआधी रोहितच्या नेतृत्वाखाली खेळलेल्या ३५-४० सामन्यांपैकी केवळ ५-६ सामने गमावले आहेत. भारतीय संघाबाबत रोहित व राहुल द्रविड यांनाही तितकीच काळजी आहे, याची मला खात्री आहे. ते सुधारणार करतील. त्यामुळे १-२ पराभवाची मला चिंता नाही, परंतु हो, हे तितकंच खरंय की आम्हाला मोठ्या स्पर्धांमध्ये चांगली कामगिरी करता आलेली नाही. आम्ही त्यावर चर्चा करू,''असे गांगुली PTI कडे म्हणाला.
भारतीय संघ पुढील २-३ आठवड्यात ट्वेंटी-२० वर्ल्ड कपसाठी ऑस्ट्रेलियासाठी रवाना होईल, असेही गांगुलीने सांगितले. गांगुलीने यावेळी आशिया चषक स्पर्धेतील विराट कोहलीच्या कामगिरीचे कौतुक केले. विराटने शतकासह २७६ धावा या स्पर्धेत केल्या.