नवी दिल्ली : सध्याच्या घडीला आयपीएलचा ज्वर चांगलाच चढला आहे. यंदाच्या आयपीएलमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा संघ गुणतालिकेत तळाला आहे. दुसरीकडे महेंद्रसिंग धोनीचा चेन्नई सुपर किंग्स हा संघ गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. त्यामुळे काही क्रिकेट चाहत्यांनी विश्वचषकासाठी कोहलीऐवजी धोनीकडे संघाचे कर्णधारपद देण्यात यावे, असे म्हणत आहेत. आज बीसीसीआयचे अध्यक्ष सी. के. खन्ना यांनी कोहलीची भेट घेतली. या भेटीमध्ये नेमकं काय दडलं आहे, याबाबत तर्कवितर्क लावले जात आहे.
काही जणांच्या मते आयपीएलमध्ये काही खेळाडू दुखापतग्रस्त झाले आहे. त्यांची दुखापत गंभीर आहे का आणि ते विश्वचषकात खेळू शकतील का, याबाबत या दोघांमध्ये चर्चा झाली असावी, असे म्हटले जात आहे. काही जणांना तर हार्दिक पंड्या आणि लोकेश राहुल यांचे प्रकरण पूर्णपणे शमल्याचे वाटत नाही. त्यामुळे याबाबत खन्ना यांनी कोहलीची भेट घेतल्याचे काही जणांना वाटत आहे. खन्ना यांनी कोहलीची भेट घेतली. या भेटीमध्ये खन्ना यांनी कोहलीचा विश्वचषकासाठी शुभेच्छा दिल्याचे म्हटले जात आहे.
खन्ना यावेळी म्हणाले की, " विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषकात सहभागी होणार आहे. त्यामुळे विश्वचषकासाठी शुभेच्छा देण्यासाठी मी कोहलीची भेट घेतली. मला आशा आहे की, कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ विश्वचषकात नेत्रदीपक कामगिरी करेल."