टीम इंडियाचा महत्त्वाचा फलंदाज पृथ्वी शॉ याला शनिवारी रणजी करंडक स्पर्धेतील कर्नाटकविरुद्धच्या सामन्यात दुखापत झाली. मुंबईचे प्रतिनिधित्व करताना पृथ्वीच्या खांद्याला दुखापत झाली आणि त्याला मैदान सोडावे लागले. दुखापतीतून सावरण्यासाठी त्याला त्वरित बंगळुरु येथील बीसीसीआयच्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत हलवण्यात आले आहे. त्यानंतर बीसीसीआयनं पृथ्वीच्या बाबतीत मोठा निर्णय घेतला आहे.
मुंबई आणि कर्नाटक यांच्यातला रणजी करंडक स्पर्धेतील सामना मुंबईच्या बीकेसी येथे खेळवण्यात आला होता. कर्नाटकने पाच विकेट राखून विजय मिळवताना मुंबईची डोकेदुखी वाढवली. मुंबईचा पहिला डाव 194 धावांवर गुंडाळून कर्नाटकनं पहिल्या डावात 218 धावा केल्या. दुसऱ्या डावातही मुंबईची घसरगुंडी कायम राहिली. त्यांना 149 धावाच करता आल्या आणि कर्नाटकनं 5 बाद 129 धावा करून सामना जिंकला.
दुखापतग्रस्त झाल्यामुळे पृथ्वी दुसऱ्या डावात फलंदाजीला आला नाही. मुंबईचे प्रशिक्षक विनायक सामंत यांनी सांगितले की,''शनिवारी सायंकाळी त्याच्या MRI रिपोर्ट काढण्यात आला. त्याला प्रचंड वेदना होत होती आणि त्यामुळे त्याला तात्काळ बंगळुरु येथे राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत पाठवण्यात आले. तेथेच त्याचावर पुढील उपचार होतील. आज सकाळी आम्हाला बीसीसीआयकडून एक मेल आला. त्यात बीसीसीआयनं पृथ्वीला रणजीतून माघारी बोलावण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे रणजी स्पर्धेच्या पुढील सामन्यांत तो खेळणार नाही.''
या दुखापतीमुळे पृथ्वीचा न्यूझीलंड दौराही संकटात आला आहे. भारत अ संघ येत्या 10 जानेवारापासून न्यूझीलंड दौऱ्यावर जाणार आहे.