मुंबई - महेंद्रसिंग धोनीने कर्णधारपद सोडून दिड वर्षांहून अधिक कालावधी झाला असूनही भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या ( BCCI) वेबसाइटवर त्याच्याच नावापुढे कर्णधार असे नमूद केले होते. धोनीच्या प्रोफाइलवर गुरूवारपर्यंत कर्णधार म्हणून उल्लेख केला होता. मात्र, प्रसार माध्यमांनी खिल्ली उडवल्यानंतर बीसीसाआयने चूक सुधारली. त्यांनी धोनीच्या नावासमोरील कर्णधारपद काढले. भारतीय क्रिकेट संघात सत्तापालट झाला आणि महेंद्रसिंग धोनीकडून सत्तासूत्र विराट कोहलीकडे गेली. 2014 मध्ये कसोटीचे आणि 2016 मध्ये वन डे क्रिकेटचे कर्णधारपद धोनीने सोडले. कसोटीमधून निवृत्ती जाहीर करणारा धोनी अजूनही मर्यादित षटकांच्या भारतीय संघाचा अविभाज्य भाग आहे. कोहली अनेकदा त्याचा सल्ला घेत एखादा निर्णय घेतो. त्यामुळे धोनी अप्रत्यक्षरीत्या अजूनही कर्णधाराच्याच भूमिकेत आहे. कोहलीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ दमदार कामगिरी करत आहे, परंतु बीसीसीआयला धोनीच्या नावासमोरील कर्णधारपद काढण्यासाठी वेळ मिळत नव्हता. अखेर प्रसार माध्यमांनी ही बाब निदर्शनास आणून दिल्यानंतर बीसीसीआयने चूक सुधारली.
महेंद्रसिंग धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007 मध्ये टी-20 आणि 2011 मध्ये वन डेचा विश्वचषक जिंकला. कॅप्टन कूल म्हणून ओळखल्या जाणा-या धोनीने संघाला अनेक अविस्मरणीय विजय मिळवून दिले आहेत. त्यामुळेच भारताच्या सर्वात यशस्वी कर्णधारांमध्ये त्याचे नाव उठावदार दिसते. त्याच्या नेतृत्वाखाली भारताने 28 वर्षांचा विश्वचषक जेतेपदाचा दुष्काळ संपवला. पाचव्याच वन डे सामन्यात त्याने पाकिस्तानच्या गोलंदाजांना सळो की पळो करून सोडले होते.