मुंबई - भारतीय क्रिकेटमध्ये सध्या मोठ्या प्रमाणात वाद निर्माण होत आहेत. एकदिवसीय कर्णधारपदावरून हटवल्यानंतर विराट कोहलीने आज प्रसारमाध्यमांशी संवाद साधत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला होता. त्यावेळी विराटने त्याला एकदिवसीय संघाचे कर्णधारपद सोडायचे नव्हते, असे स्पष्टपणे सांगितले. तसेच टी-२० कर्णधारपदाबाबतही विराटने मोठे विधान केले आहे. विराटच्या या दाव्यांमुळे वाढलेल्या वादावर आता बीसीसीआयने प्रत्युत्तर दिलं आहे.
बीसीसीआयमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार बीसीसीआयचं म्हणणं आहे की, कर्णधारपदावरून हटवण्याची माहिती दिली गेली नाही, असं विराट कोहली म्हणू शकत नाही. आम्ही विराट कोहलीसोबत सप्टेंबर महिन्यामध्ये बोललो होतो. तसेच त्याला टी-२० कप्तानी सोडू नको, असा सल्ला दिला होता.
विराट कोहलीने टी-२० संघाचे कर्णधारपद सोडल्याने मर्यादित षटकांच्या क्रिकेटसाठी दोन कर्णधार ठेवणे सोपे नव्हते. तसेच जेव्हा विराट कोहलीला एकदिवसीय संघाच्या कर्णधारपदावरून हटवण्यात आले तेव्हा त्याची माहिती निवड समितीचे प्रमुख चेतन शर्मा यांनी विराट कोहलीला फोन करून दिली होती, अशी माहितीही बीसीसीआयच्या सूत्रांनी दिली आहे.