BCCI retained Chetan Sharma as chairman of selectors: चेतन शर्मा यांना पुरुष क्रिकेट संघाच्या निवड समितीच्या अध्यक्षपदी कायम ठेवण्यात आले आहे, अशी घोषणा बीसीसीआयने शनिवारी (७ जानेवारी) केली. टी२० विश्वचषकात टीम इंडियाच्या सुमार कामगिरीमुळे चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची हकालपट्टी करण्यात आली होती. मात्र नव्या समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा चेतन शर्मा यांनाच कायम ठेवण्यात आले आहे. पण असे असले तरी जुन्या समितीतील कायम असलेले ते केवळ एकमेव सदस्य आहेत. त्याशिवाय, सलील अंकोला, शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी आणि श्रीधरन शरथ हे निवड समितीतील चार नवीन सदस्य असणार आहेत.
अशी पार पडली नियुक्ती प्रक्रिया
BCCI ने अखिल भारतीय वरिष्ठ पुरुष निवड समितीच्या नियुक्त्यांची अधिकृत ट्विटच्या माध्यमातून घोषणा केली. सुलक्षणा नाईक, अशोक मल्होत्रा आणि जतिन परांजपे यांचा समावेश असलेल्या क्रिकेट सल्लागार समितीने (CAC) अखिल भारतीय वरिष्ठ निवड समितीच्या सदस्यांची निवड करण्यासाठी विस्तृत प्रक्रिया हाती घेतली होती. १८ नोव्हेंबर २०२२ रोजी त्यांच्या अधिकृत वेबसाइटवर जारी केलेल्या पाच पदांसाठीच्या जाहिरातीनंतर मंडळाला सुमारे ६०० अर्ज प्राप्त झाले होते. योग्य विचार आणि काळजीपूर्वक छाननी केल्यावर, CAC ने वैयक्तिक मुलाखतीसाठी ११ उमेदवारांची निवड केली होती. मुलाखतींच्या आधारे, समितीने वरिष्ठ पुरुषांच्या राष्ट्रीय निवड समितीसाठी चेतन शर्मा, शिव सुंदर दास, सुब्रतो बॅनर्जी, सलील अंकोला आणि श्रीधरन शरथ यांची शिफारस केली आहे. या समितीने वरिष्ठ पुरुष निवड समितीच्या अध्यक्षपदासाठी चेतन शर्मा यांची शिफारस केली.
शर्यतीत होते अनेक दिग्गज खेळाडू
भारताचा माजी वेगवान गोलंदाज व्यंकटेश प्रसाद, डोडा गणेश, माजी यष्टीरक्षक नयन मोंगिया, माजी डावखुरा फिरकी गोलंदाज मनिंदर सिंग, निखिल चोप्रा, शिव सुंदर दास, अजय रात्रा यांच्यासह काही प्रसिद्ध देशांतर्गत क्रिकेटपटू यांची नावे शर्यतीत मोठी नावे होती. माजी निवडकर्ता चेतन शर्मा यांचेही नाव यात पुढे आले होतेच. अशा वेळी BCCIने पुन्हा एकदा त्यांच्यावर विश्वास दाखवत त्यांना कायम ठेवले. मात्र त्यांच्या नेतृत्वाखालील समितीतील सदस्य पूर्णपणे बदलून नव्या चार चेहऱ्यांना संधी देण्यात आली आहे.