Hardik Pandya Injury : भारताचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्या दुखापतीमुळे न्यूझीलंडविरूद्धच्या सामन्याला मुकणार आहे. बीसीसीआयने याबाबत माहिती दिली असून तो थेट इंग्लंडविरूद्धच्या सामन्यासाठी टीम इंडियासोबत प्रवास करेल. हार्दिक पांड्याला बांगलादेशच्या डावाच्या नवव्या षटकात गोलंदाजी करताना दुखापत झाली. तिसऱ्या चेंडूवर स्ट्रेट ड्राइव्हचा फटका पायाने आडवण्याच्या प्रयत्नात हार्दिकचा पाय मुरगळला. त्याच्या घोट्याला गंभीर इजा झाली अन् भारताची डोकेदुखी वाढली. पांड्याला स्टेडियमजवळील एका खासगी रुग्णालयात नेऊन त्याच्या पायाचे स्कॅन करण्यात आले.
भारत आणि बांगलादेश यांच्यात पुण्यातील महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर सामना पार पडला. या सामन्यादरम्यान पहिल्या डावात गोलंदाजी करताना हार्दिकच्या पायाला दुखापत झाली. दुखापत गंभीर असल्याने पांड्या अर्धवट षटक सोडून मैदानाबाहेर गेला. मग विराट कोहलीला निम्मे षटक टाकावे लागले. बीसीसीआयने दिलेल्या माहितीनुसार, हार्दिक पांड्या विश्रांती घेत आहे. त्याच्या दुखापतीवर बीसीसीआयचे वैद्यकिय पथक लक्ष ठेवून आहे. हार्दिक पांड्याला दुखापत झाल्यामुळे तो २० ऑक्टोबरला संघासोबत धर्मशालाला जाणार नाही. त्यामुळे तो थेट लखनौमध्ये भारत आणि इंग्लंड या सामन्यासाठी संघासोबत उपस्थित असेल.
भारताचा विजयी चौकार बांगलादेशला पराभूत करून यजमान भारतीय संघाने वन डे विश्वचषकात विजयाचा चौकार लगावला. विराट कोहलीने शानदार शतक झळकावून भारताच्या विजयावर शिक्कामोर्तब केला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने चांगली सुरूवात केली. भारतीय गोलंदाजांना तरसवताना बांगलादेशच्या सलामीवीरांना पहिल्या बळीसाठी ९३ धावांची भागीदारी नोंदवली. सलामीवीर तंजिद हसन (५१) आणि लिटन दास (६६) यांनी अप्रतिम खेळी केली. मात्र, सलामी जोडी तंबूत परतल्यानंतर बांगलादेशचा गड कोसळला. मग भारतीय गोलंदाजांनी पुनरागमन करत प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांची कोंडी केली. बांगलादेशने दिलेल्या २५७ धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने स्फोटक सुरूवात केली. कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी पॉवरप्लेमध्ये धावांचा पाऊस पाडून विजयाकडे कूच केली. मात्र, रोहित त्याच्या अर्धशतकाला मुकला आणि (४८) धावांवर बाद झाला. तर, गिल ५५ चेंडूत ५३ धावांची खेळी करून तंबूत परतला. त्यानंतर विराट कोहली नाबाद (१०३) आणि लोकेश राहुलने नाबाद (३४) धावा करून भारताच्या विजयाचा चौकार मारला.