नवी दिल्ली: टी-२० विश्वचषकातील निराशाजनक कामगिरीनंतर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने शनिवारी चेतन शर्मा यांच्या अध्यक्षतेखालील निवड समितीची हकालपट्टी केली. आयसीसी स्पर्धेतील अपयशानंतर बीसीसीआय आता कठोर पावले उचलण्याच्या पवित्र्यात दिसत आहे आणि आता त्यांचा पुढील मोर्चा मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविडकडे वळणार असल्याची चर्चा आहे.
टी-२० संघाचे कर्णधारपद नव्या खेळाडूकडे सोपवण्याची तयारी सुरू असताना आता प्रशिक्षक बदलाच्या चर्चेनेही वेग घेतला आहे. बीसीसीआय लवकरच राहुल द्रविडसोबत याबाबत चर्चा करेल. वेगवेगळ्या फॉरमॅटसाठी वेगळा कर्णधार आणि प्रशिक्षक अशी संकल्पना बीसीसीआय आणू पाहते आहे. बीसीसीआयने २०२४ च्या विश्वचषकाच्या तयारीला सुरुवात केली आहे.
बीसीसीआयच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, आता आम्हाला कोणताच धोका पत्करायचा नाही. टी-२० संघासाठी नव्या कर्णधार निवडण्याबाबत आम्ही रोहित शर्माशी चर्चा केली आहे आणि त्याची काहीच हरकत नाही. अशीच चर्चा राहुलसोबत करणार आहोत. त्यांच्यावरील वर्क लोड कमी करणे, हा त्यामागचा हेतू आहे. ऑस्ट्रेलियातील टी-२० विश्वचषकामध्ये आलेल्या अपयशानंतर टीम इंडियात बरेच बदल पाहायला मिळणे अपेक्षित आहे.
दरम्यान, बीसीसीआयने निवड समितीची हकालपट्टी केल्यानंतर आता नवीन अध्यक्ष कोण असणार याची चर्चा सुरु झाली आहे. मीडिया रिपोर्ट्सनूसार, भारतीय संघाचा माजी स्टार क्रिकेटर अजित आगरकर निवड समितीचा अध्यक्ष होण्याच्या शर्यतीत आघाडीवर आहे. अजित आगरकर यांनी याआधीही या पदासाठी अर्ज केला होता, मात्र गेल्या वेळी त्यांना संधी मिळाली नव्हती. परंतु यंदा अजित आगरकर निवड समितीचे अध्यक्ष होण्याची शक्यता जास्त असल्याचे सांगण्यात येत आहे.