India vs England 5th Test : भारतीय संघाने पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेत इंग्लंडविरुद्ध ४-१ असा विजय मिळवला. धरमशाला येथे सुरू असलेल्या पाचव्या कसोटीत तिसऱ्याच दिवशी इंग्लंडचा निकाल लागला. इंग्लंडचा पहिला डाव २१८ धावांवर गुंडाळून भारताने पहिल्या डावात ४७७ धावा केल्या आणि २५९ धावांची आघाडी घेतली. इंग्लंडचा दुसरा डाव १९५ धावांवर गडगडला आणि भारताने एक डाव व ६४ धावांनी सामना जिंकला. या ऐतिहासिक विजयानंतर बीसीसीआयचे सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी मोठी घोषणा केली.
''सीनियर टीमसाठी 'कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना' सुरू केल्याची घोषणा करताना मला आनंद होत आहे, जे आमच्या प्रतिष्ठित खेळाडूंना आर्थिक वाढ आणि स्थिरता प्रदान करण्याच्या उद्देशाने एक पाऊल आहे. २०२२-२३ हंगामापासून सुरू होणारी, 'कसोटी क्रिकेट प्रोत्साहन योजना' ही कसोटी सामन्यांसाठी दिल्या जाणाऱ्या १५ लाखांच्या मॅच फी व्यतिरिक्त असणआर आहे,'' असे जय शाह यांनी ट्विट केले.
वर्षाला ९ कसोटी सामने गृहीत धरल्यास, जे खेळाडू ५० टक्क्यांपेक्षा कमी सामने खेळतील त्यांना प्रोत्साहनपर रक्कम मिळणार नाही. जे खेळाडू ५० टक्क्यांपेक्षा जास्त म्हणजेच ५ ते ६ कसोटी सामने खेळतील त्यांना प्रती सामना ३० लाख इन्सेंटीव्ह मिळेल, ज्यांचा प्लेइंग इलेव्हनमध्ये समावेश नसेल पण ते उपलब्ध असतील त्यांना प्रती सामना १५ लाख मिळतील. हिच टक्केवारी ७५ टक्क्यांच्या वर झाल्यास प्लेइंग इलेव्हनमधील खेळाडूला ४५ लाख मिळतील.