भारतीय क्रिकेट नियामक मंडळ अर्थात BCCI ही जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट संघटना आहे. बीसीसीआयकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेला ( ICC) खूप मोठा आर्थिक फायदा होतो आणि त्यामुळेच आयसीसीच्या महसुल वितरणात बीसीसीआयला सर्वाधिक वाटा दिला जातो. इंडियन प्रीमिअर लीगमधून बीसीसीआयला दरवर्षी हजारो कोटींचा नफा होतोय.. अशा आर्थिक संपन्न बीसीसीआयची सर्व सूत्र हाती असलेल्या सचिव जय शाह ( Jay Shah) यांनी इतिहास रचला आहे. जय शाह यांना स्पोर्ट्स बिझनेस लीडर ऑफ द इयर २०२३ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
सोशल मीडियावर ही माहिती देताना बीसीसीआयने म्हटले की, हा सन्मान भारतीय क्रीडा प्रशासनातील कोणत्याही व्यक्तीला मिळालेला पहिला सन्मान आहे. त्यांच्या या कृतीने खेळ पूर्णपणे बदलला आहे. जय शाह यांच्या नेतृत्वाने क्रिकेट जगतात छाप सोडली. पुरुषांच्या वर्ल्ड कप स्पर्धेला नवीन उंचीवर नेणे, वेतन समानता प्रस्थापित करणे आणि महिला प्रीमियर लीग, ऑलिम्पिकमध्ये क्रिकेटचा समावेश करण्याच्या मार्गावर अग्रगण्य अशा अनेक उपक्रम आहेत, ज्याने खेळ कायमचा बदलला आहे.
भारताने नुकतेच वन डे वर्ल्ड कप स्पर्धेचे यजमानपद भूषवले. वर्ल्ड कपसाठी भारतात आलेल्या संघांचे आदरातिथ्य असो की टूर्नामेंट मॅनेजमेंट असो, त्याची जगभरात चर्चा झाली. कोरोना महामारीच्या काळातही त्यांनी मंडळाचे नुकसान होऊ दिले नाही आणि बायो बबलमध्ये स्पर्धा आयोजित करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.
वर्ल्ड कप स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाकडून पराभव पत्करावा लागला. त्यानंतर जय शाह यांनी टीम इंडियाचे मनोबल वाढवण्यासाठी पोस्ट लिहिली होती. त्यांनी लिहिले होते की, भारतीय संघ वर्ल्ड कप फायनलमध्ये ऑस्ट्रेलियासमोर विजयासाठी कमी पडला असला तरी त्यांचा इथवरचा प्रवास हा प्रेरणादायी आहे. भारतीय संघाने खेळलेला प्रत्येक सामना हा संघाच्या अविचल आत्मा, दृढनिश्चय आणि कौशल्याचा पुरावा देणारा ठरला. अंतिम फेरीपर्यंत सर्व १० सामने जिंकून त्यांनी क्रिकेटचे खरे सार दाखवले. हा खेळ जितका सुंदर आहे तितकाच अप्रत्याशितही आहे. संपूर्ण देश या खेळाडूंच्या पाठीशी आहे.